डोंबिवलीत ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमनेसामने, नेमकं कारण काय?
डोंबिवलीतील सुनिलनगर उद्यानात प्रस्तावित २५ लाख रुपयांच्या वाचनालयावरून शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात तीव्र वाद निर्माण झाला आहे. ठाकरे गट उद्यानात वाचनालय उभारण्यास विरोध करत असून, मुलांच्या खेळण्याच्या जागेवर तडा जाईल, असा दावा करतो आहे.

डोंबिवलीतील होणाऱ्या एका वाचनालयावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. डोंबिवली पूर्वेकडील सुनिलनगर भागातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात प्रस्तावित असलेल्या वाचनालयावरून शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या वाचनालयाला ठाकरे गटाने तीव्र विरोध दर्शवला आहे. तर शिंदे गटाने हे वाचनालय निश्चितपणे होणार असल्याचा दावा केला आहे. या वाचनालयावरुन डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवलीतील सुनिलनगर उद्यानात २५ लाख रुपयांच्या निधीतून वाचनालय उभारले जाणार आहे. या वाचनालयासाठी अधिकृत परवानगी घेण्यात आल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, ठाकरे गटाचे म्हणणे आहे की हे उद्यान लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. येथे वाचनालय झाल्यास मुलांच्या खेळण्याची जागा कमी होईल. त्यामुळे उद्यानाचा मूळ उद्देशच संपून जाईल. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख अभिजीत सावंत यांनी स्थानिक नागरिकांसोबत जाहीर भूमिका घेतली आहे. “हे गार्डन लहान मुलांसाठी आहे आणि आम्ही येथे कोणत्याही परिस्थितीत वाचनालय होऊ देणार नाही.” असे अभिजीत सावंत म्हणाले.
शिंदे गटाची प्रतिक्रिया काय?
दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांनी ठाकरे गटाच्या भूमिकेवर उघडपणे स्पष्टीकरण दिले आहे. हे वाचनालय नागरिकांच्या सोयीसाठी उभारले जात आहे. यात आधुनिक सुविधा असतील. जे लोक अनधिकृत जाहिरातींवर काही बोलत नाहीत, ते नागरिकांसाठी उभ्या राहणाऱ्या अधिकृत वाचनालयाला विरोध करत आहेत, अशा शब्दात नितीन पाटील यांनी टीका केली.
या वाचनालयाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. त्यामुळे डोंबिवलीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. आता या वाचनालयाचे भविष्य काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे