इंदू मिलमधील बाबासाहेबांच्या पुतळ्यात 100 फूटांनी वाढ, निधी 400 कोटींनी वधारला
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज (15 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत (Babasaheb Aambedkar monument) घेण्यात आला.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज (15 जानेवारी) मंत्रिमंडळ बैठकीत (Babasaheb Aambedkar monument) घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250 फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. तसेच स्मारकाचा चबुतरा 100 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट (Babasaheb Aambedkar monument) इतकी होणार आहे.
स्मारकाच्या निधीतही 400 कोटींची वाढ केली असून आता एकून 1100 कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठं ग्रंथालयही असणार आहे. विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे.
पुतळ्याची उंची वाढल्यामुळे यासाठी लागणारे ब्राँझचे आणि लोखंडाचे प्रमाण वाढेल. तसेच पुतळ्याच्या पायाची देखील वाढ होईल. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये 6 मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.
या स्मारकामध्ये 68 टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी 400 लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच 1000 लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.