कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्यांना दिवाळीपूर्वी शिथिलता? डॉ. भारती पवार म्हणतात, तज्ज्ञांचं मत घ्या
लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मतं विचारात घ्यायला हवी. तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी अशा शिफारसी नसल्याचं पवार यांनी म्हटलंय.
पुणे : कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना दिवाळीपूर्वी शिथिलता देण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. त्याबाबत टाक्स फोर्सच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. मात्र, या शक्यतेबाबत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. लसीच्या डोसबाबत तज्ज्ञांची मतं विचारात घ्यायला हवी. तज्ज्ञांकडून अद्याप तरी एक डोस घेतलेल्यांना प्रवास, मॉल किंवा इतर कुठे जाण्यास परवानगी द्यावी अशा शिफारसी नसल्याचं पवार यांनी म्हटलंय. (Dr. Bharti Pawar’s reaction on relaxations in corona restrictions before Diwali)
त्याचबरोबर लसीच्या तुटवड्यावर हा पर्याय असू शकत नाही दोन लसींमधील अंतर कमी करण्याची मागणी राज्य सरकारने केली आहे. पण हा राजकीय विषय नाही. याबाबत शास्त्रज्ञांकडून योग्य अभ्यास होऊन निर्णय होणं अपेक्षित आहे, असंही डॉ. भारती पवार म्हणाल्या. राजेश टोपे यांनी कोरोना लसीचा एक डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोना नियमांतून शिथिलता देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यावर डॉ. पवार यांनी आपलं मत मांडलं आहे.
महाराष्ट्र आणि केरळात अजुनही बऱ्यापैकी रुग्ण
पुणे महापालिकेकडून कोरोना काळात चांगलं काम झालं. त्यांनी ऑक्सिजन प्लांट उभारले. केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या गाईडलाईन्सचे पालन केले. अतिरिक्त हॉस्पिटल बिलं कमी केली. पुणे महापालिकेच्या 88 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पुणे महापालिकेच्या हद्दीत 88 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट अचानक आवली होती. महाराष्ट्र आणि केरळात अजुनही बऱ्यापैकी रुग्ण आहेत. लॉकडाऊन किंवा निर्बंधांबाबत स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा अशी केंद्राची भूमिका असल्याचं पवार यांनी सांगितलं.
‘कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही’
भारतात कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. काही देशात तिसरी आणि चौथी लाट आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्या दृष्टीने तयारी सुरु केली आहे. सध्यातरी पहिल्या आणि दुसऱ्या लसीच्या डोसबाबत गाईडलाईन्स आहेत. बुस्टर डोसबाबत अद्याप कुठलीही मार्गदर्शक तत्वे नाहीत, असं डॉ. पवार यांनी सांगितलं. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आवश्यक बाबी लवकरच पूर्ण केल्या जातील, असंही भारती पवार म्हणाल्या.
आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी राज्यात कोरोना निर्बंध शिथिल करण्याचे संकेत दिलेत. पुढच्या काही दिवसात राज्यातल्या मॉल, दुकानं, हॉटेल्स याबाबत काही अटी नियम शिथिल होतील असे सरकारकडून संकेत मिळतायत, त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आज टास्कफोर्सच्या बोलवलेल्या बैठकीला महत्व प्राप्त झालंय.
नेमके बदल काय होतील?
सध्यस्थितीत व्यापारी दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्स यांना रात्री 10 वाजेपर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी आहे. हॉटेल्समध्येही 50 टक्के ग्राहकांनाच मुभा आहे. दसरा आता पार पडलाय आणि दिवाळी तोंडावर आहे. त्यामुळे सण उत्सवात लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यातच मुंबईत काल एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ह्या सर्व पार्श्वभूमीवर दुकानं, बार, रेस्टॉरंट, मॉल्सच्या वेळेची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा निर्णयही एक दोन दिवसातच सरकारी जारी करेल अशीही सूत्रांची माहिती आहे.
इतर बातम्या :
मुंबईकरांसाठी आजच दसरा दिवाळी, एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही, संक्रमणाचा रेटही घटला
Dr. Bharti Pawar’s reaction on relaxations in corona restrictions before Diwali