मॉर्निंग वॉकला जाताय, सरकारने 17 शहरातील नागरिकांना केले सावध
दिवाळीत एरव्ही प्रदुषणाची पातळी वाढत असते. यंदा ऑक्टोबरमध्ये देशातील मुंबईसह अनेक शहरातील प्रदुषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने राज्यातील 17 प्रदुषित शहरातील नागरिकांसाठी सावधान करीत नियमावली जारी केली आहे. तुमच्या शहराचे यात नाव आहे का ते पाहा
मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : मुंबईसह राज्यातील अनेक शहरातील प्रदुषणाच्या पातळीत दिवाळी आधीच वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 3 नोव्हेंबरच्या आकडेवारीनूसार जगातील दहा सर्वात प्रदुषित शहरात दिल्ली मुंबईसह देशातील तीन शहराचा पहिल्या पाचमध्ये समावेश झाल्यानंतर परिस्थिती बिकट बनली आहे. वाढते प्रदुषणाने आरोग्य विभागाकडून राज्यातील सतरा शहरांसाठी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. हवेत धुलीकणाचे प्रमाणे मोठ्या प्रमाणावर वाढल्याने घरात एअर प्युरीफायर वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तर बाहेर पडताना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले असून काही दिवस सकाळ आणि संध्याकाळी चालायला जाऊ नका असे आवाहन केले आहे.
वाढत्या प्रदुषणामुळे श्वसनाचा त्रास तसेच डोळे चुरचुरणे, घशाला त्रास अशा तक्रारी वाढल्या आहेत. मुंबईतील गेल्या काही दिवसातील प्रदुषणाची पातळी प्रचंड वाढली आहे. मुंबईतील पाच पैकी चार कुटुंबातील एका सदस्याला घसादुखी आणि खोकल्याचा त्रास होत आहे. मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील वायूप्रदुषणासाठी विविध बांधकाम साईटवर निर्माण होणारी धुळीला कारणीभूत ठरवून रस्ते धुण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, हवेतील प्रदुषणाला वाहनांमधून निघणाऱ्या धुराला अनेकांनी जबाबदार ठरविले आहे.
या आरोग्याच्या तक्रारी
प्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत ‘लोकल सर्कल’ने सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणाला सात हजार मुंबईकरांना प्रश्न विचारण्यात आले. वायू प्रदूषणामुळे आरोग्याच्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे वगैरे प्रश्न विचारण्यात आले होते. या प्रश्नांना 2539 लोकांनी प्रतिसाद दिला आहे. यामध्ये 78 टक्के लोकांना घसा खवखवणे आणि खोकल्याची तक्रार आहे. तर 44 टक्के लोकांनी डोळ्यांत जळजळ, 39 टक्के लोकांनी वाहणारे नाक आणि छातीत जळजळ, 28 टक्के लोकांनी श्वास घेण्यास त्रास, 22 टक्के लोकांनी निद्रानाश आणि 17 टक्के लोकांनी डोकेदु:खी होत असल्याची तक्रार केली आहे.
या सतरा शहरामधील लोकांना इशारा
राज्यातील 17 प्रमुख शहरांमध्ये प्रदुषणाचा धोका वाढल्याने आरोग्य विभागाने नियमावाली जारी केली आहे. या शहरामध्ये सोलापूर, मुंबई, नाशिक, अमरावती, सांगली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, अकोला, बदलापूर, उल्हासनगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, चंद्रपूर, नवी मुंबई या सतरा शहरामधील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सरकारकडून खबरदारीचा सल्ला
- सकाळी आणि संध्याकाळी घराबाहेर फिरायला जाणं टाळा
- सकाळी आणि संध्याकाळी घराच्या दरवाजे खिडक्या उघडू नका
- दुपारी 12 ते 4 बाहेर पडण्याचा सल्ला
- मास्क वापरण्याला प्राधान्य द्यावं
- लाकूड, कोळसा, आणि अन्य ज्वलनशील गोष्टी जाळणे टाळा
- दिवाळीत फटाके फोडणं टाळण्याचा सरकारचा सल्ला