Chandrapur : ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात असून भीषण धुळीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, शाळेत जायला विद्यार्थी घाबरतात
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी इथल्या नागरिकांसाठी शाप होत चालल्या आहेत. देशभर टेकड्यांच्या भूस्खलनाची चर्चा जनजीवन विस्कळीत होणे व पुनर्वसन या दिशेने सुरू आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सास्ती लगतच्या गोवरी-पोवनी-साखरी-माथरा या खेड्यांमध्ये कोळसा खाणीच्या (coal mines) ब्लास्टिंगमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रचंड धुळीमुळे शेतशिवारे मातीमोल झाली आहेत, तर शालेय विद्यार्थी देखील जीव मुठीत धरून शाळेत जात आहेत. गावातील नागरिकांचे व जनावरांचे आरोग्य प्रचंड ब्लास्टिंग आणि उडत असलेल्या धुरळ्यामुळं धोक्यात आलं आहे. तिथल्या नागरिकांनी तिथल्या यावर उपाय काढावा अशी मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 50 हून अधिक कोळसा खाणी आहेत. मात्र यातील खुल्या कोळसा खाणी आसपासच्या खेड्यांसाठी शापचं ठरल्याची चर्चा आहे. राजुरा तालुक्यातील (Rajura Taluka) सास्ती परिसरातल्या गोवरी व अन्य सात गावांमध्ये कोळसा खाणीतील महाप्रचंड ब्लास्टिंग व त्यातून निघणाऱ्या धुळीने जनजीवन त्रासदायक केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणी इथल्या नागरिकांसाठी शाप होत चालल्या आहेत. देशभर टेकड्यांच्या भूस्खलनाची चर्चा जनजीवन विस्कळीत होणे व पुनर्वसन या दिशेने सुरू आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील खुल्या कोळसा खाणीच्या आसपास असणाऱ्या खेड्यांची स्थिती त्याहून भीषण असल्याची नागगिरकांचं म्हणणं आहे.
जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातल्या सास्ती परिसरात असलेल्या गोवरी-पोवनी -माथरा व अन्य सहा गावांनी गेली काही वर्षे कोळसा खाणीत होणाऱ्या अतिप्रचंड ब्लास्टिंगचा त्रास अनुभवला आहे. या ब्लास्टिंगमुळे घरांना तडे जात असून भीषण धुळीमुळे जनजीवन धुळमय झाले आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची अवस्था देखील अतिशय वाईट आहे. हे चिमुकले दहशतीत शिक्षण घेत आहेत. महाभयानक ब्लास्टिंग मुळे संपूर्ण धरणी हादरल्यावर मुलं एका खोलीत गोलाकार बसून भीतीदायक वातावरणात ती काही मिनिटं घालवतात अशी माहिती विद्यार्थी हितेश विधाते याने सांगितली आहे.
शेतीची अवस्था वाईट आहे. खुल्या कोळसा खाणीसाठी शेकडो हेक्टर जमिनी अधिग्रहित झाल्याने शेतकऱ्यांची दैनंदिनी उद्ध्वस्त झाली आहे. त्याचबरोबर हाती पैसा आला असला तरी तो गुंतवण्यासाठी योग्य मार्गदर्शन नसल्याने या भागातील शेतकरी शांत झालाय. ज्यांच्याकडे थोडी शेती आहे त्यांना कोळसा खाणीतील ब्लास्टिंग, त्यातून निघणारी रोजची अतिप्रचंड धूळ, त्याचे पिकावर होणारे विपरीत परिणाम, नापिकी व शेवटी आत्महत्या अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, अशी व्यथा दिलीप वैद्य, शेतकरी यांनी मांडली.
कोळसा खाण जुनी असली तर गेली दोन वर्षे या खाणीतील ब्लास्टिंगचा त्रास वाढल्याची तक्रार स्थानिक लोक करत आहेत. ब्लास्टिंग व धुळीचा गावातील प्रत्येक घटकावर विपरीत परिणाम होत असून यासंदर्भात कुठलीही नुकसान भरपाई दिली जात नसल्याने नागरिकांचे जीवनस्तर खालावत चालला आहे. या भागातील नागरिक मोठ्या आंदोलनाच्या तयारीत असल्याचं माथरा सरपंच हरिदास झाडे यांनी सांगितलं.