ओबीसी नेत्यांची तासभर चर्चा, संभाजीराजे नेमके काय म्हणाले?
आज महाराष्ट्रात सामाजिक समतोल ढासळला आहे. हे लोक खालच्या स्तरावरची भाषणे करतात. लोकांना भडकविण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा सांमजस्याने वागा. तुमच्याकडे माहिती असेल तर ज्यांनी घरे पेटवले त्यांना अटक करा.
मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : राज्यात हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात सामाजिक समतोल ढासळत आहे. असे असताना १२ बलुतेदार यांनी पुढाकार घेतला याचा आनंद आहे. त्यांनी सांगितले की आपण पुढाकार घ्या. मराठा समाज येईलच. आमचे काही प्रपोजल आहे हे आम्हाला तुम्हाला दाखवायचे आहे. त्यामुळे माझी जबाबदारी अजून वाढली आहे. मराठा समाजाबद्दल मी नेहमीच बोलतो. पण, बारा बलुतेदारांनाही न्याय मिळाला पाहिजे ही आता माझी जबाबदारी आहे असे प्रतिपादन संभाजी राजे छत्रपती यांनी केले. १२ बलुतेदार आणि १८ पगड जाती होत्या. त्यानंतर शाहू महारांजांनी आरक्षण द्यायला सुरूवात केली असेही त्यांनी सांगितले.
आज महाराष्ट्रात सामाजिक समतोल ढासळला आहे. हे लोक खालच्या स्तरावरची भाषणे करतात. अशावेळी कुणीतरी पुढाकार घ्यायला पाहिजे जो हरीभाऊ राठोड यांनी घेतला. मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट वेगळा आहे. रोहिणी आयोगाचा रिपोर्ट अजून जाहीर झाला नाही. मी परवाच मागासवर्ग आयोगाला भेटलो. त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने आरक्षण द्यायची तयारी आहे, असे संभाजी राजे छत्रपती यांनी सांगितले.
हरीभाऊ राठोड यांनी तीन वर्षांपूर्वी जे सांगितले ते मला पटले नव्हते. आजही पटले आहे असे मी म्हणत नाही. पण, ऐकण्याच्या मानसिकतेतून मी आलो आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आपण कॅटेगरीईज पद्धतीने कुणाला न दुखावता कुणाच्या आरक्षणाला धक्का लावता आरक्षण दिले जाऊ शकते. आज १२ बलुतेदार आले कारण त्यांच्यात रोष आहे. त्यांना आरक्षण जाहीर झाले पण मिळत नाही. त्यामुळे तुम्ही पुढे येऊन बोललात यासाठी तुमचे कौतुक असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी १२ बलुतेदार यांची पाठ थोपटली.
सरकारने १२ बलुतेदार आणि हरीभाऊ राठोड यांना संधी द्यावी. प्रस्थापित असो व मुख्यमंत्री असो. त्यांनी इतरांचे ऐकले पाहिजे. वंशज म्हणून मी पत्र देईन. त्यामुळे आरक्षण मिळत असेल तर आनंदच आहे. सरकार या पुढे बैठक कशी घेईल हे मी पाहतो. भुजबळ यांचे ते अंबडचे भाषण कुणालाच भावले नाही. ना ओबीसींना आवडले. जरांगे यांनी त्यांच्या मागण्या सरकारला सांगितल्या आहेत. त्यांच्यात आणि सरकारमध्ये संवाद सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
लोकांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार ऐकावा. गुण्यागोविंदाने राहावे. जे कुणी प्रस्थापित आहेत ते लोकांना भडकविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. लोकांना भडकविण्याचे वक्तव्य करण्यापेक्षा सांमजस्याने वागा असा सल्ला त्यांनी दिला. तुमच्याकडे माहिती असेल तर ज्यांनी घरे पेटवले त्यांना अटक करा. आता वेळ पडली तर थेट दिल्लीला आंदोलन करू असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.