त्या रुग्णांना पाहून नीलम गोऱ्हे यांचे डोळे पाणावले… म्हणाल्या, आम्ही कुटुंबासोबत आहोत
तळवडे येथील स्पार्कल कॅन्डल बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट होवून लागलेल्या आगीत दहा जण जखमी झाले आहेत. त्या जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुणे | 9 डिसेंबर 2023 : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील आपत्तीजनक उद्योग आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये कुठलीही परवानगी न घेता महापालिका क्षेत्रात मिळेल त्या जागेत उद्योग उभे राहत आहेत. अशा अनियमित उद्योगांचे सर्वेक्षण करून नियमतीकरण करणे आवश्यक आहे. तसेच, आपत्तीजनक उद्योग यांची पाहणी करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश सर्वेक्षण आपत्ती आणि पुर्नवसन विभागाला दिले आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नगरविकास आणि महापालिका यांनीही विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे, असे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.
तळवडे येथील स्पार्कल कॅन्डल बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट होवून लागलेल्या आगीत दहा जण जखमी झाले आहेत. त्या जखमींना ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी ससून रूग्णालयाला भेट देऊन या रूग्णांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यातील एका जखमी रुग्णाने नीलम गोऱ्हे यांना ‘ताई आपण आमच्या कुटुंबाच्या मागे उभे रहा…’ अशी साद घातली.
त्या रुग्णाने घातलेली साद ऐकून, त्याने दाखविलेला जिव्हाळा आणि आपलेपणा पाहून डॉ. नीलम गोऱ्हे यांचे डोळे पाणावले. यानंतर पत्रकारांशी बोलताना तळवडे येथील घटना गंभीर आहे. रूग्णांची अवस्था पाहवेनाशी आहे. एका पीडित व्यक्तीने त्या अवस्थेत नमस्कार केला. ताई आपण आमच्या कुटुंबाच्या मागे उभे रहा… असे ते म्हणाले. यावर सरकार तुमच्या पाठीशी आहे. एक माणूस म्हणून आम्ही कुटुंबासोबत आहोत, असे त्यांना सांगितले अशी माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.
तळवडे येथील ही घटना दुर्दैवी आहे. या घटेनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधी आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडूनही मदत करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, गंभीर जखमी रूग्णांना तात्काळ उत्तोमत्तम उपचार द्यावे. रूग्णांची प्रकृती सुधारावी आणि ते लवकर बरे व्हावे अशी भावना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.
सर्किट हाऊस येथे या संदर्भात बैठक घेतली. सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी त्याबाबत सर्वेक्षण सुरू केले आहे. प्रामुख्याने कोणत्या भागात धोकादायक कंपन्या, कारखाने आहेत हे या सर्व्हेक्षणातून समोर येणार आहे. या सर्वेक्षणाचे निरीक्षण अधिवेशनात मांडून सरकार पाठपुरावा करेल. त्यासोबतच मृतांच्या कुटुंबियांना धीर देऊन त्यांच्या घरातील लहान मुले, त्यांचे शिक्षण यासह पुढील संगोपन आणि पुर्नवसनासाठी काम करण्यात येईल. त्यासाठी सामाजिक सुरक्षा योजना राबविण्यात येणार आहे असेही डॉ, नीलम गोऱ्हे म्हणाल्या.