देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले होते?; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट काय?
महाराष्ट्रात पैशाचा पाऊस पडत आहे. पाऊस कितीही पडू द्या. नरेंद्र मोदी यांचा पराभव अटळ आहे. विकासाचा मुद्दा निवडणुकीत असताना तर मोदी आणि शिंदे यांच्या हेलिकॉप्टर वा विमानातून बॅगा उतरल्या नसत्या. त्यांनी पैशाचं वाटप केलं नसतं. संपूर्ण प्रचारात मोदी विकासावर बोलले आहेत का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देखील बोलले आहेत का?, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे. फडणवीस हे राज ठाकरे यांना काय म्हणायचे हेच राऊत यांनी उघड केलं आहे. राज ठाकरे हे सुपारीबाज आहेत, अशी पहिली गर्जना भाजपने केली होती. आम्ही नाही केली. राज ठाकरे सुपारी घेऊन प्रचार करतात किंवा पाठिंबा देतात हे आम्ही कधीच म्हणालो नाही. राज ठाकरे आणि त्यांचा पक्ष सुपारी घेतो. सुपारी घेऊनच ते प्रचार करतात हे देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलं आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना विचारा. फडणवीस यांना विस्मरणाचा झटका आला नसेल तर ते सांगतील, असा गौप्यस्फोटच संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला. तसेच नारायण राणे यांच्याबद्दल बोलण्यासही नकार दिला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्ला चढवला. छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे हे किमान 15 ते 20 सुटकेस घेऊन हॉटेल शालिमारला थांबले होते. छत्रपती शाहू महाराजांना आम्ही सर्वांनी पाठिंबा दिला. ते महाराष्ट्राचे भूषण आहेत. छत्रपतींचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी 15 ते 20 सुटकेस घेऊन हे महाशय हॉटेल शालिमारला उतरले होते. त्यांनी पैशाचं वाटप केलं होतं. तरीही शाहू महाराज विजयी होत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधानांनी पाहावं, ज्ञान देऊ नये
राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचा नाशिक येथील व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महाराष्ट्रातल्या 11 जागांवर आज निवडणुका होत आहेत. त्यात संभाजीनगर आणि पुणे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणी काल रात्रीपासूनच पैशाचं वाटप आणि पैशांची देवाणघेवाण सुरू असल्याचं स्पष्ट दिसत आहे. धंगेकर हे पुण्याचे उमेदवार आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनसमोर धरणे धरलं होतं. पोलिसांच्या मदतीने पैशाचा वाटप आहे. पंतप्रधानांनी हे पाहावं. केवळ ज्ञान देण्याचं काम करू नये. फडणवीस हे गृहमंत्री आहेत. त्यांनीही हे पाहावं, असं संजय राऊत म्हणाले.
बॅगेत 500 सूट आणले का?
नगरमध्ये तर खुलेआम पैसे वाटले जात आहेत. काही लोकांना पैसे वाटप करताना पकडलं आहे. विखे पाटलांचे चिरंजीव हजारो, लाखो रुपये घेऊन आल्याचं चित्र आहे. नाशिकला मुख्यमंत्री आले होते. दोन तासांसाठी आले होते. जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरताना दिसत आहे. दोन तासाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी या बॅगेत 500 सूट आणले का? 500 सफारी आणल्या का? त्या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कुणाला वाटप झालं? याचे व्हिडीओही आम्ही लवकर देणार आहोत, असं राऊत यांनी सांगितलं.
त्याचा तपास कोणी करायचा?
बॅगेत मुख्यमंत्र्यांच्या फायली असतील. पण आचारसंहिता असताना ते फायलीवर सही करू शकत नाही. आमची वाहनं तपासली जात आहेत. मल्लिकार्जुन खरगे यांचं हेलिकॉप्टर तपासलं जातं. मी सांगलीत गेलो, माझं हेलिकॉप्टरही तपासलं. पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचे खोके उतरत आहेत. बॉक्स उतरत आहेत. त्याचा तपास कोणी करायचा? निवडणूक आयोगाच्या डोळ्यावर झापडं पडली आहेत का? असा सवाल त्यांनी केला.