नरेंद्र मोदी यांचा उद्धव ठाकरेंकडून एकेरी उल्लेख, एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जळगावात केलेली टीका सध्या चर्चेत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरेंवर प्रतिक्रिया दिली.
मुंबई : जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्यातील सभेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा एकेरी उल्लेख केल्याने भाजप नेते चांगलेच भडकले आहेत. आता शिवसेनेचे नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावरून निषेध व्यक्त केलाय. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचं हे वक्तव्य अत्यंत दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. मोदी यांची लोकप्रियता देशातच नव्हे तर जगभरात असताना उद्धव ठाकरे यांनी द्वेषापायी हे वक्तव्य केल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
मुंबईत आज महसूल विभागाची, वातावरणीय बदल, अवकाळी, गारपीट या पार्श्वभूमीवर महत्त्वाची परिषद आयोजित करण्यात आली आहे. वातावरण बदलावर साधक-बाधक चर्चा या परिषदेत होईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होतेय.या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
उद्धव ठाकरेंच्या टीकेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ हे दुर्दैवी वक्तव्य आहे. या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देशात नव्हे तर जगभरात सिद्ध केलंय. या देशाची अर्थव्यवस्था एवढ्या उंचीवर नेण्याची व्यवस्था केली आहे. जी 20 चं यजमानत्व मिळवलं आहे. मोदींचा एकेरी उल्लेख करणं याची जेवढी निंदा, निषेध करणं तेवढा थोडा आहे. प्रत्येक देशवासियांना अभिमान वाटावा, असं त्यांचं काम आहे. संपूर्ण देशातील दीडशे कोटी जनता त्यांचा परिवार आहे. जनतेला ते आपलं मानतात. त्यांच्या मातोश्रींचं दुःख झालं तरीही त्यांनी देशातील प्रकल्पाला प्राधान्य दिलं. जे कालचं वक्तव्य झालं, ते वैयक्तिक द्वेषातून आलं आहे. समोरील व्यक्तीच्या यशामुळे पोटदुखी निर्माण होते. त्यामुळे असं वक्तव्य करण्याचं पाप करतात…
बाळासाहेबांचे विचार पायदळी..
तर नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तुडवले, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली. ते म्हणाले, ‘ ज्यांनी 25 वर्षे युती म्हणून काम केलं. त्यांच्याबाबत हे असं बोलत आहेत. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सत्तेसाठी पायदळी तुडवले. त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? हे त्यांनी काल सिद्ध करून दाखवली आहे. मोदींची लोकप्रियता देशातच नव्हे तर जगात आहे. पण ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडून द्वेषाची वक्तव्येच येत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बाळासाहेबांनी दुश्मनाबद्दलही कुणाबाबत असं वक्तव्य केलेलं नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी सुनावलं.
उद्धव ठाकरे यांचं नेमकं वक्तव्य काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जळगावात केलेली टीका सध्या चर्चेत आहे. घराणेशाहीवरून बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ घराणेशाहीमध्येही घराण्याची परंपरा असते. अरे तुला आगे ना पिछा.. तुला तर कुणी नाहीये. तू कोणत्याही वेळी झोळी लटकवशील आणि निघून जाशील, पण माझ्या जनतेच्या हातात भीकेचा कटोरा देऊन जाशील, त्याचं काय करायचं? मी फकीर आहे, झोळी लटकवून निघून जाईन. जाशील बाबा, पण माझी जनता भीकेचं कटोरं घेऊन फिरेल ना वणवण त्याचं काय? म्हणून काहीतरी घराण्याची परंपरा लागते, वारसा लागतो’, असं उद्धव ठाकरे म्हणाले.