एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द, फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत, अमित शाहांसोबत बैठक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक रद्द झाला आहे. महायुतीतील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी हा दौरा होता. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अचानक अखेर रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एकनाथ शिंदे आज रात्री दिल्लीला जाणार होते. महायुतीच्या जागावाटपावर अंतिम तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती होती. एकनाथ शिंदे गोव्याहून दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. पण शिंदे यांचा हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. शिंदे यांचा दिल्ली दौरा रद्द होण्यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, उपुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले आहेत. त्यांची दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होणार आहे. या बैठकीत तीनही नेत्यांची महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भाजपकडून आतापर्यंत 99 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 उमेदवारांची आणि अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. याचाच अर्थ महायुतीकडून आतापर्यंत एकूण 182 जागांवरील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. अद्यापही 105 जागांचा तिढा कायम आहे. हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीत महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. जागावाटपावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आज दुपारीच दिल्लीला रवाना झाले होते. त्यानंतर संध्याकाळी अजित पवार दिल्लीला रवाना झाले. यानंतर एकनाथ शिंदे रात्री दिल्लीला जाणार असल्याची माहिती होती. पण शिंदे यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला.
शिंदे हे 87 जागांवर निवडणूक लढण्यावर ठाम, पण…
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 87 जागांवर निवडणूक लढण्यावर ठाम आहेत. पण भाजप शिवसेनेसाठी 15 जागा सोडायला तयार नाही. याच जागांबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अमित शाह यांची दिल्लीत जावून भेट घेणार होते. विशेष म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची अमित शाहांसोबत एकत्र बैठक होणार होती. पण या बैठकीला आज शिंदे कदाचित गैरहजर राहण्याची शक्यता आहे. शिंदे उद्या आपला उमेदवारी अर्ज देखील भरणार आहेत. त्यामुळे महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कधी निश्चित होतो ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.