मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी एकनाथ शिंदे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यात आला. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येतील का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली. “आमची विचारधारा ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांचं हिंदुत्व, त्यांची विचारधारा, त्यांची वैचारिक भूमिका घेऊन आज आम्ही पुढे जात आहोत. आम्ही हा निर्णय का घेतला? आम्ही त्यांना सांगितलं की, आपण पुन्हा शिवसेना-भाजप युती करु. कारण शेवटी आपण शिवसेना-भाजप युती म्हणूल लढलो आणि सरकार कोणाबरोबर बोलावलं? तर काँग्रेस बरोबर. बाळासाहेबांना ते नको होतं”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“बाळासाहेब कधीही म्हणायचे की, शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. त्याच काँग्रेसला उद्धव ठाकरेंनी जवळ घेतलं आणि सरकार बनवलं. ते सरकार राज्याला अधोगतीकडे घेऊन चाललं. शिवसेना खड्ड्यात घालायला गेले. शिवसेना आणि धनुष्यबाण काँग्रेसच्या दावणीला बांधली. म्हणून आम्ही गेलो. आमची विचारधारा ही बाळासाहेबांची आणि विकासाची आहे. आता त्यांनी त्यांचा मार्ग निवडला आहे”, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.
यावेळी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र जाण्यासाठी तुमचे दरवाजे उघडे आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली. “कशासाठी? आम्ही राज्याच्या हितासाठी लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि रिझल्ट दिले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे ‘मातोश्री’ला गेले असं कधी होईल का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भूमिका मांडली. “जर-तरला काय अर्थ आहे. वर्तमानमध्ये आम्ही जे काम करतोय, मला अभिमान आहे की, एवढ्या दोन वर्षात अनेक कामं केली. त्यांनी पायबंध केलेली प्रकल्प आम्ही सुरु केले. मोठ्या प्रमाणात कल्याणकारी योजना आणल्या, याचा अभिमान आहे, समाधान आहे. लोकांची खुशी त्यात आमची खुशी आहे. लोकांचं समाधान त्यात आमचं समाधान असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.