लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर गाढवाचे चित्र, कुणावर संशय?; शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांचा दावा काय?
आता लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर गाढवाचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sanjay Shirsat on Ladki Bahin Yojana : राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये दिले जाणार आहेत. सध्या या योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. असंख्य महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता या योजनेच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मवर गाढवाचे चित्र पाहायला मिळत आहे. यावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गैरव्यवहार होत असल्याचे प्रकार पुढे येत आहेत. याप्रकरणी लवकरच गुन्हा दाखल होणार आहे. लाडकी बहिण योजनेचा काही जण दुरुपयोग करत आहेत. या योजनेला खीळ बसावी, असा विरोधकांचा प्रयत्न सुरू आहेत. काही फॉर्मवर गाढवाचे चित्र, काही ठिकाणी विचित्र फोटो टाकलेत. हा विरोधकांचा डाव आहे, पण ही योजना यशस्वी होणार. ज्यांनी गैरप्रकार केले त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
आपले आधार लावून महिलांचे फोटो लावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात ग्रामीण भागापासून तर शहरापर्यंत यशस्वी ठरत आहे. मात्र काही दलाल या योजनेचा फायदा करुन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ठिकाणी चुकीचे फॉर्म भरुन योजनेला बदनाम केले जात आहे. ज्या महिलांच्या नावाने अर्ज आहेत, त्यांना लाभ मिळायला हवा. हे ब्लॅकमेलिंगचे प्रकार आहेत. आपले आधार लावून महिलांचे फोटो लावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही संजय शिरसाट यांनी सांगितले.
उद्धव बाळासाहेब गटाला दुसरं काही सुचत नाही. न्यायाधीशाने केलेली आरती येव्हंदा मोठा विषय नाही. न्यायमूर्ती हे न्याय दानाचे काम करत असतात. आरतीला गेल्यावर तर्क वितर्क लावणे हा बालिशपणा आहे. विरोधी पक्षातील नेता जर सत्तेतील लोकांच्या घरी गेला म्हणजे गळाभेट झाली असे नाही. त्यांच्या भेटीचा आणि कामाचा सबंध जोडता कामा नये, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
एखाद्याला मदत केली तर त्यात गैर काय?
लालबागचा राजा पाहण्यासाठी वेगवेगळी ट्रीटमेंट दिली जाते. सर्वसामान्य भाविकांना तासनतास उभे राहावे लागते. मी जो व्हिडीओ पाहिला. त्यामुळे VIP आणि सर्व सामन्यांना न्याय द्यावा, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले. आमदार यामिनी जाधव यांनी बुरखा वाटप केला आणि महिलांनी तो घेतला. यात आक्षेप घेण्याचे कारण नाही. एखाद्याला मदत केली तर त्यात गैर काय? असेही संजय शिरसाट म्हणाले.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्यासाठी काम सुरू
“आमची भूमिका काय असायला हवी. मागील 40 वर्षापासून रखडत ठेवले. मराठा समाजाला योग्य न्याय मिळायला पाहिजे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता आरक्षण देण्यासाठी काम सुरू आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालतात, सर्व जनता आपली आहे”, असेही संजय शिरसाट म्हणाले.