धनुष्यबाण चिन्हावरुन एकनाथ शिंदे यांची घणाघाती टीका; एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो करत असतांना कसबा निवडणुकीत हेमंत रासने यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेल्या हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पुण्यात होते. हेमंत रासने यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी रोड शो केलाय. कसबा पेठ मतदार संघात शिंदे यांच्या रोड शोला मोठी गर्दी होती. याच वेळी रोड शो संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करत असतांना उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर निशाणा साधला आहे. कसबा निवडणुकीच्या प्रचारसभेत ऑनलाईन हजेरी लावली होती. त्यास धनुष्यबाण चिन्हावरुन केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोड शो करत असतांना पुण्यात कसबा निवडणुकीत हेमंत रासने यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ऑनलाईन भाषणावरुन टोला लगावला आहे.
जे ऑनलाईन भाषण करत आहे त्यांना ऑनलाईनच राहूद्या, एकनाथ शिंदे हा साधा कार्यकर्ता आहे. कुणालाही भेटतो, हे तुमचं सरकार आहे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर ऑनलाईन प्रचार सभेत सहभागी झाल्यावरून घणाघाती टीका केली आहे.
याशिवाय उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह चोरल्यावरुन जहरी टीका केली होती. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडे अडीच वर्षापूर्वी धनुष्यबाण गहाण ठेवला होता तो मी सोडविला आहे असं विधान करत थेट उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. रोड शो नंतर एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडलेली नाही.
लोकांना देणारे सरकार असून घेणारे सरकार नाही, एकनाथ शिंदे हा जनतेला भेटणारा माणूस असून पळणारा माणूस नाही म्हणत महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे यांनी यावेळी अडीच वर्षात विकास झाला नाही म्हणत रखडलेल्या विकासकामांचा पाढा वाचला आहे.
खरं तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरुन एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात मोठे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीये.
अशातच आता रोड शो च्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील प्रचारात उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत आहे. त्यामुळे पुढील कात शिंदे आणि ठाकरे यांच्यातील आरोप प्रत्यारोप कोणत्या वळणावर जाऊन पोहचतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.