निवडणूक आयोगाने जाहीर केला एकूण मतदारांचा आकडा, कोणत्या जिल्ह्यात किती मतदार? जाणून घ्या
मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे.
Election Commission Voters List : राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. येत्या काही महिन्यातच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष जोरदार कामाला लागले आहे. विविध पक्षातील नेते महाराष्ट्रात दौरे करताना दिसत आहेत. त्यातच आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील मतदार नोंदणीत तब्बल 16 लाख 98 हजार 368 मतदार वाढल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच निवडणूक आयोगाने याबद्दलची आकडेवारी जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय निवडणूक आयोगाने 6 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट यादरम्यान मतदार यादी अपडेट करण्याचे काम हाती घेतले होते. यात नवीन मतदारांची नोंदणी करणे, मतदारांची नावं, पत्ते आणि अन्य तपशील दुरुस्त करण्याच्या कामांचा समावेश होता. त्यासोबतच मृत्यू झालेले मतदार, कायमचे स्थलांतर याबद्दलही तपशील अपडेट करण्यात आला.
राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 मतदार
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीमध्ये राज्यात एकूण 9 कोटी 36 लाख 75 हजार 934 इतके मतदार होते. पण, मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात 20 लाख 78 हजार 081 नव्या मतदारांचे अर्ज आले. यात 8 लाख 80 हजार 676 पुरूष मतदार तर 11 लाख 97 हजार 240 महिला मतदारांचा समावेश होता.
पण त्यातील काही हरकतीनंतर 3 लाख 79 हजार 713 अर्ज वगळण्यात आले आहेत. त्यामुळे आता मतदार यादीत 16 लाख 98 हजार 368 नव्या मतदारांची भर पडली आहे. निवडणूक आयोगने जाहीर केलेल्या अंतिम मतदार यादीत महाराष्ट्रात मतदारांची संख्या 9 कोटी 53 लाख 74 हजार 302 इतकी झाली आहे. यात 4 कोटी 93 लाख 33 हजार 996 पुरूष तर 4 कोटी 60 लाख 34 हजार 362 महिला मतदार आहेत. तर 5 हजार 944 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे.
पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा
या मतदारांच्या वाढत्या संख्येत पुणे जिल्हा सर्वाधिक मतदार असणारा जिल्हा ठरला आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात 86 लाख 47 हजार 172 मतदार आहेत. तर मुंबई उपनगरमध्ये 75 लाख 82 हजार 866 आणि ठाणे जिल्ह्यात 70 लाख 7 हजार 606 मतदार आहेत.
तसेच यात 18 ते 19 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या 18 लाख 67 हजार इतकी आहे. तर 20 ते 29 वर्ष वयोगटातील मतदारांची संख्या 1 कोटी 81 कोटी इतकी आहे. त्यासोबत 21 हजार 558 दिव्यांग मतदार आहेत. तर नंदुरबार, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात महिला मतदारांचं प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. आता या नवीन मतदार नोंदणीचा फायदा नेमका कोणाला होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सर्वाधिक मतदार असलेले इतर जिल्हे
नाशिक : 49 लाख 82 हजार 490
नागपूर : 44 लाख 35 हजार 553
सोलापूर : 37 लाख 63 हजार 789
अहमदनगर : 37 लाख 27 हजार 799
जळगाव : 36 लाख 16 हजार 403
कोल्हापूर : 32 लाख 51 हजार 192
छत्रपती संभाजी नगर : 31 लाख 45 हजार 203