या मार्गांवर एसटीच्या इलेक्ट्रीक बस धावणार, पाहा किती आहे भाडे ?
एसटी महामंडळाने 5150 वातानुकूलित ई-बसेस खरेदी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. या संपूर्ण वातानुकूलित बसेसना अत्यंत माफक तिकीट दर आकारण्यात येणार आहेत.
मुंबई | 12 फेब्रुवारी 2024 : एसटी महामंडळ आता कात टाकणार आहे. एसटी महामंडळाचा प्रवास आता धुर आणि ध्वनी प्रदुषण मुक्त होणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेल्या या ई-बसेसचे भाडे देखील किफायतशीर असणार आहे. मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता ठाणे येथील खोपट बस स्थानकावरुन एसटीच्या या नवीन ई-बसेसचे लोकार्पण होणार आहे. या ईलेक्ट्रीक बसेसमध्ये महिलांना अर्धे तिकीट आकारण्यात येणार आहे.
एसटी महामंडळाने स्पर्धेत ठिकण्यासाठी 5150 वातानुकूलित ई-बसेस खरेदी करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्यातील 173 पेक्षा जादा स्थानकांवर ई-चार्जिंगची स्थानके निर्माण केली जाणार आहेत. या योजनेची सुरुवात बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावरुन सुरु करण्यात येत आहे. याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
या पहिल्या टप्प्यातील इलेक्ट्रीक बसेस या 34 आसनी असणार आहेत. संपूर्ण वातानुकूलित अशा ई-बसेस उद्यापासून बोरीवली-ठाणे-नाशिक या मार्गावर धावणार आहेत. याचा तिकीट दर सध्याच्या हिरकणी ( एशियाड ) बसेस सारखाच असणार आहे. विशेष म्हणजे या बसमध्ये महिलांना 50 टक्के, 65 ते 75वर्षा पर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना 50 टक्के तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना 100 टक्के मोफत सवलत देण्यात येणार आहे.
या संकेतस्थळावरुन बुकींग करा
या बसेसच्या आगाऊ आरक्षणासाठी www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळाबरोबरच msrtc mobile reservation App या मोबाईल आरक्षण ॲपवर देखील उपलब्ध होणार आहेत. या सेवेचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.
असे आहे भाडे
ठाणे ते बोरीवली – 65 रुपये
ठाणे ते नाशिक ( भिवंडी मार्गे ) – 350 रुपये
ठाणे ते नाशिक ( भिवंडी बायपास ) – 340 रुपये
बोरीवली ठाणे मार्गे नाशिक ( भिवंडी बायपास ) – 405 रुपये
बस सेवेची वैशिष्ट्ये काय ?
1 ) 34 आसनी मिडी बस
2 ) संपूर्ण वातानुकूलित
3 ) एका चार्जिंग मध्ये 200 किमी प्रवास
4) केवळ 2 तासांत पूर्ण चार्जिंग
5) बोरीवली-नाशिक रु 405/-
6) ठाणे-नाशिक रु 340 /-
7 ) महिला आणि 65-75 वर्ष दरम्यानच्या जस्ट नागरिकांना तिकडं 50 टक्के सवलत
8 ) अमृत ज्येष्ठ म्हणजेच 75 वर्षावरील नागरिकांना तिकिटात शंभर टक्के सवलत