शेतकऱ्यांनी जगायची की मरायचं; 30 गावातील शेतीची वीज तोडली…
शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुले शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच वीज महावितरण कंपनींकडून वीज कनेक्शन तोडल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.

अहमदनगर : ऐन रब्बी हंगामत एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला आहे .तर दुसरीकडे मात्र वीज महावितरण कंपन्यांनी वीज तोडून शेतकऱ्यांना दुसरा धक्का दिला आहे. त्यामुळे आता शेतकरीवर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील सुमारे 30 गावांची शेतीची वीज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
आधीच कांद्याच्या बाजारभावामुळे शेतकरी प्रचंड वैतागलेला आहे. त्या शेतकऱ्याला आता उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच वीज वितरण कंपनीने झटका दिला आहे.
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अॅड. प्रताप ढाकणे यांनी आक्रमक भूमिका घेत वीज वितरणचा निषेध व्यक्त करत कार्यालयाला टाळे ठोकले होते.
अखेर तीन तासानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन पूर्ववत करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील या प्रकारामुळे कांदा उत्पादक आणि भाजीपाला, रब्बी हंगामातील पीक धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शेतीची वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतीला पाणी द्यायचे कसे असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता.
अहमदनगर, नाशिक, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तर दुसरीकडे शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळाला नसल्यामुले शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यातच वीज महावितरण कंपनींकडून वीज कनेक्शन तोडल्यामुळे येथील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता.
वीज महावितरण कंपनीकडून वीज कनेक्शन तोडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांच्याकडून आंदोलन करत वीज वितरणच्या कार्यालयालाच टाळे ठोकण्यात आले. त्यानंतर वीज महावितरण कंपनीनेही आंदोलकांमुळे माघार घेत वीज पुरवठा सुरळीत करण्याचे अश्वासन दिले आहे.