कॅन्सरच्या उपचारातील भेदभाव दूर करा, तज्ज्ञ काय सांगतात? वाचा सविस्तर
या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल या भारतातील सर्वात मोठ्या कॅन्सर उपचार शृंखलेतर्फे #CloseTheCareGap या संकल्पनेवर आधारित लाईव्ह वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : कर्करोगाच्या (Cancer) उपचारामध्ये होणारा वंश, धर्म, प्रदेश आणि आर्थिकस्तरावर आधारीत भेदभाव दूर केला पाहिजे. सर्वांना समान उपचार करून रुग्णांना जीवघेण्या आजारातून (Health) बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे, असं आवाहन जागतिक कर्करोग दिनानिमित्ताने आयोजित वेबिनारमध्ये तज्ज्ञांनी केलं. या वर्षीच्या जागतिक कर्करोग दिनाच्या औचित्याने एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल या भारतातील सर्वात मोठ्या कॅन्सर उपचार शृंखलेतर्फे #CloseTheCareGap या संकल्पनेवर आधारित लाईव्ह वेबिनार सत्राचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात कर्करोगावरील उपचारांच्या (Treatment On cancer) उपलब्धतेतील विविध प्रकारचे अडथळे ओळखणे आणि हाताळणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट होते. कर्करोगावरील उपचारांमधील असलेल्या असमानतेवर हे वेबिनार केंद्रित होते. त्याचप्रमाणे कर्करोगावर वेळेवर उपचार करणे, ते सहज उपलब्ध होणे आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठीची औषधे आणि उपचार सुविधा यांची टंचाई आहे, हा गैरसमज दूर करणे हेही या वेबिनारते उद्दिष्ट होते.
उपचारांमधील दरी कमी करण्यावर फोकस
या लाइव्ह वेबिनार मध्ये एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. बी. एस. अजय कुमार हे प्रमुख वक्ते होते आणि हेल्थकेअर ग्लोबल एंटरप्राइजेस लिमिटेडच्या वैद्यकीय सेवा विभागाच्या संचालक डॉ. चंद्रिका कंबम यांनी या वेबिनारचे संचालन केले. या वेबिनारमध्ये पाच कर्करुग्णांनी सक्रिय सहभाग घेतला. कोलकाता येथील एचसीजी एको कॅन्सर सेंटरमधील दिलीप घोषाल, मुंबईतील एचसीजी कॅन्सर सेंटरमधील प्रीथा प्रभाकर, जयपूरमधील एचसीजी कॅन्सर सेंटरमधील भिवेश चौधरी, बंगळुरू येथील एचसीजी कॅन्सर सेंटरमधील इंदरपाल कौर आणि अहमदाबादमधील एचसीजी कॅन्सर सेंटरमधील सुरेंद्र त्यागी यांचा त्यात समावेश होता. याहून महत्त्वाचे म्हणजे या वेबिनारमध्ये, कर्करुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना भेडसावणाऱ्या समस्या कमी करण्यासाठी कर्करोग उपचारांमधील दरी कमी करण्याच्या मार्गांवर प्रकाश टाकण्यात आला. क्लोज द केअर गॅप हे तीन वर्षांचे अभियान आहे. जगभरात अपेक्षित उपचार निष्पत्ती मिळविण्यास प्रतिबंध करणाऱ्या अनेक अडथळ्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हे अभियान तयार करण्यात आले आहे. कर्करोगांच्या उपचारांबद्दल असलेले गैरसमज दूर करण्यावर आणि वंश, धर्म, प्रदेश व आर्थिक स्तर या आधारे कर्करोगाच्या उपचारांमध्ये होणारा भेदभाव नष्ट करण्यासाठी काम करण्यावर या अभियानात प्रकाश टाकण्यात आला आहे. या भेदभावाचा कर्करुग्णांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवरही गंभीर परिणाम होतो.
आरोग्यसेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हावी
कर्करोग, त्यावरील उपचारांबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि कर्करोगाविषयी असलेले गैरसमज दूर करणे याला आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. या वर्षी #CloseTheCareGap अभियानाची व्याप्ती वाढविण्यासाठी आम्ही व्हर्च्युअल वेबिनारचे आयोजन केले. प्रत्येक व्यक्तीला सुरुवातीलाच योग्य उपचार मिळण्याचा हक्क आहे आणि कोणत्याही प्रकारचा पक्षपात वा पूर्वग्रहाशिवाय सर्वांचेच हित व कल्याण साधले जाण्याची खातरजमा केली पाहिजे हे या महामारीने आपल्याला आवाहन केले आहे. आरोग्यसेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हाव्या यासाठी सर्व दऱ्या बुजविणे अत्यावश्यक आहे, असं एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. बी. एस. अजय कुमार यांनी सांगितलं.
भारत, आफ्रिकेत उपचाराचे जाळे
हेल्थकेअर ग्लोबल एंटप्रायझेस लि. (एचसीजी) हे भारतातील सर्वात मोठे कर्करोग उपचार पुरवठादार आहेत. भारत व आफ्रिकेतील 24 सर्वसमावेशक केंद्रांच्या नेटवर्कच्या माध्यमातून एचसीजीने लाखो लोकांच्या घरापर्यंत आधुनिक कर्करोग उपचार पोहोचविले आहेत. एचसीजीच्या सर्वसमावेशक कॅन्सर केंद्रांच्या माध्यमातून एका छताखाली कर्करोगाचे निदान व उपचार करण्यासाठीचे कौशल्या व प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध करून देतात. मिलन ब्रँडच्या अंतर्गत एचसीजीचे सात फर्टिलिटी केंद्रांमध्येही काम चालते.