मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील इमर्जन्सी मेडिकल रुम बंद, प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर
रेल्वे स्थानकावर एखादा अपघात झाला तर प्रवाशांना वेळेत तातडीचे उपचार मिळावेत म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने रेल्वे स्थानकांवर उघडण्यात आलेली इमर्जन्सी मेडीकल रुम सध्या बंद झालेली आहेत.
मुंबईतील वाढते अपघात बळी पाहून प्रवाशांना ‘गोल्डन अवर’ मध्ये अत्यावश्यक उपचार मिळावेत यासाठी सामाजिक कार्यकर्ते समीर झव्हेरी यांच्या एका जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सर्व उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आपात्कालीन वैद्यकीय कक्षाची स्थापना करण्यात आली होती. या पैकी मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील आपात्कालिन वैद्यकीय कक्ष गेल्या काही महिन्यांपासून बंद असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
मुंबई उपनगरीय मार्गावर लोकलचा रोजचा धकाधकीचा प्रवास करताना दररोज दहा जणांचा मृत्यू व्हायचा आणि वर्षाला जवळपास अडीच हजाराहून अधिक प्रवाशांचा मृत्य व्हायचा. जखमींची संख्याही साधारण तेवढीच असायची. आता दररोज सरासरी 8 प्रवाशांचा मृत्यू होतो. या प्रकरणात माहिती अधिकार कार्यकर्ते ज्येष्ठ समाजसेवर समीर झव्हेरी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचुड ( सध्या भारताचे सरन्यायाधीश ) यांच्या खंडपीठा समोर झाली होती. PIL no. 50/2008 वर सुनावणी करताना हायकोर्टाचे तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्ष उभारण्याचे आदेश रेल्वेला दिले होते. यानंतर मध्य आणि हार्बर तसेच पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर आपात्कालिन वैद्यकीय कक्ष सुरु करण्यात आले.
साल 2023 च्या आकडेवारीनुसार मध्य रेल्वेच्या 19 रेल्वे स्थानकांवर इमर्जन्सी मेडीकल रुम सुरु करण्यात आल्या होत्या. मध्य रेल्वेच्या स्थानकांवरील या मेडिकल इमर्जन्सी रुम बंद असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी दिली आहे. या प्रकरणी मॅजिकडील कंपनीने वन रुपी क्लीनिक उघडून प्रवाशांना एक रुपयात निदानाची सुविधा उपलब्ध केली होती. मॅजिक डील हेल्थ कंपनीचे प्रमुख डॉ.राहुल घुले यांच्या संपर्क केला असता त्यांनी मध्य रेल्वेच्या डीआरएमना आमच्या आपात्कालिन वैद्यकीय कक्षाची गरज नसल्याचे म्हटले आहे.
या स्थानकांवर होती सुविधा
मध्य रेल्वेच्या कर्जत, मानखुर्द, टिटवाळा, कुर्ला, उल्हासनगर, कळवण, भांडुप, पनवेल, ठाणे, चेंबूर, भायखळा, घाटकोपर, विक्रोळी, सायन, डोंबिवली, वाशी, दादर, गोवंडी आदी 19 स्थानकांवर साल 2023 रोजी रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आपात्कालिक वैद्यकीय कक्षाची उभारणी करण्यात आली होती. यातील बहुतांशी इमर्जन्सी मेडीकल रुम बंद पडल्या असल्याची माहिती समीर झव्हेरी यांनी दिली आहे.