नागपुरात चहा विक्रेत्याने उचलले टोकाचे पाऊल, आमदाराच्या कार्यालयात दिली सुसाईड नोट
नागपुरातील चहा विक्रेता रॉबर्ट फ्रान्सिस यांनी महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी कारवाईमुळे आपला चहाचा स्टॉल गमावल्यानंतर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि एक सुसाईड नोट लिहिली.

नागपुरात चहाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमण विरोधी कारवाईमुळे या चहाचा स्टॉल चालवणाऱ्या व्यक्तीने अत्यंत निराशाजनक पाऊल उचलले आहे. रॉबर्ट फ्रान्सिस असे या व्यक्तीचे नाव आहे. महानगरपालिका आणि पोलिसांनी त्याचे चहाचे दुकान जप्त केल्याने त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याच अवस्थेत ते सुभाष नगर येथील एका आमदाराच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट लिहिली होती. यात त्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे माझ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. यामुळे मी टोकाचे पाऊल उचलत आहे, असे त्यांनी या सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे.
झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न
रॉबर्ट फ्रान्सिस यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुपारी १ च्या सुमारास ते आमदारांच्या कार्यालयात पोहोचले. यानंतर त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांकडे एक पत्रक दिले. यात त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती.
खासगी रुग्णालयात उपचार सुरु
कार्यालयातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्सिस त्यावेळी नशेत असल्याप्रमाणे दिसत होते. काही वेळानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या. यानंतर त्यांची प्रकृती गंभीर झाली. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे शहरात अतिक्रमण कारवाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांवर होणाऱ्या परिणामांवर चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास करत आहेत.