संजय राऊत नाशकात येण्याआधीच शिंदे गटाचा करेक्ट कार्यक्रम; ठाकरे गटाला खिंडार…
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत नशिक दौऱ्यावर येत असतांना शिंदे गटाने राऊत यांच्यासह ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) नाशिक दौऱ्यावर येण्यापूर्वी शिंदे गटाकडून संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे ( Shivsena Thackeray ) गटाला मोठा धक्का देण्यात आला आहे. खासदार संजय राऊत हे आज नाशिक दौऱ्यावर येत आहे. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटात कुणी प्रवेश तर करणार नाही ना ? अशी चर्चा सुरू असतांना माजी नगरसेविका तथा युवासेनेच्या पदाधिकारी असलेल्या पती पत्नीने शिंदे गटाची वाट धरली आहे. ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत हर्षदा गायकर आणि संदीप गायकर हे आज वर्षा बंगल्यावर शिंदे गटात प्रवेश करणार आहे.
संदीप गायकर हे विद्यार्थी सेनेपासून शिवसेनेत काम करत होते. त्यानंतर ते युवासेनेचे पदाधिकारी म्हणून नाशिकमध्ये काम करत आहे. याच दरम्यान त्यांच्या पत्नी देखील युवासेनेच्या पदाधिकारी असून माजी नगरसेविका आहेत.
त्यामुळे संजय राऊत यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. माजी नगरसेविका गायकर यांनी शिंदे गटाचे खासदार गोडसे यांनी विकास निधी दिल्याने त्यांनी त्यांना एका कार्यक्रमाला बोलविल्याने तेव्हाच त्यांच्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती.
असं असलं तरी दुसरीकडे संजय राऊत यांचा नाशिक दौरा आणि त्यानंतर ठाकरे गटाचे नगरसेवक किंवा पदाधिकारी शिंदे गटात सामील होणं हे एक समीकरण बनल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात पुन्हा संजय राऊत नाशिकला येण्यापूर्वीच गायकर यांचा प्रवेश होणार असल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.
संजय राऊत यांचा नाशिक दौरा आणि शिंदे गटात ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा प्रवेश ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. आताही नाशिक मधील माजी नगरसेविका हर्षदा गायकर आणि तिचे पती संदीप गायकर यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे.
संजय राऊत हे नाशिकमध्ये येण्यापूर्वीच दोन्ही पदाधिकारी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करण्यासाठी रवाना झालेले आहेत. एकूणच नाशिक मधील ठाकरे गटाला शिंदे गटाकडून धक्का देण्याचं काम गेल्या काही महिन्यांपासून सुरूच आहे.
संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक ही नाशिकमध्ये पार पडणार आहे. ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल करण्यासाठी वारंवार नाशिकमध्ये दौरे केले जात आहे.
डॅमेज कंट्रोल करण्यासाठी येणारे संजय राऊत यांना शिंदे गटाने धक्का दिला आहे. गायकर यांच्या प्रवेशाने सिडकोतील महत्त्वाचा पदाधिकारी शिंदे गटाच्या गळाला लागलेला आहे.
संजय राऊत हे ठाकरे गटाची बाजू मांडत असताना शिंदे गटावर कोणता हल्लाबोल करणार अशी चर्चा सुरू नाशिकमध्ये सुरू असतांना गायकर यांचा शिंदे गटाच्या प्रवेशाने नाशिकच्या शिवसेना सह राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.