मुंबई । 27 जुलै 2023 : राज्यात पावसाने अनेक जिल्ह्याना झोडपले आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान झाले आहे तर काही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने आमदारांना आपापल्या मतदारसंघात जाता येत नाही. आढावा घेता येत नाही. त्यामुळे अनेक आमदारांनी अधिवेशन लवकर संपवा अशी मागणी केली होती. विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशन पूर्ण काळ चालविण्याची मागणी करत सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोप केला. त्यावर आज झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला.
कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पावसाळी अधिवेशनाला चार दिवस सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विरोधी पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
आज घेण्यात आलेल्या निर्णयानुसार शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार असे चार दिवस अधिवेशन होणार नाही. तर, पुढील बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार असे तीन दिवस अधिवेशन होणार आहे. विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात पावसाचे प्रमाण वाढले असून काही ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आमदार आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील नुकसानीचा आढावा घेऊन त्यानंतर ती माहिती सभागृहाला अवगत करून देतील. राज्यातील एकूण नुकसानीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात सर्विस्तर निवेदन करून नुकसानग्रस्तांसाठी मोठी मदत जाहीर करतील अशी माहिती विधानभवनातील सूत्रांनी दिली.