अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, रात्री नेमकं काय घडलं? महत्त्वाची अपडेट समोर
याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी नेमकं काय घडलं? याचीही माहिती दिली आहे.
Anil Deshmukh Attack : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरु आहे. काल महाराष्ट्रातील प्रचारतोफा थंडावल्या. त्यातच सोमवारी (१८ नोव्हेंबर) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये अनिल देशमुख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर नागपुरात सध्या तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांनी नेमकं काय घडलं? याचीही माहिती दिली आहे.
अनिल देशमुख यांच्यावर सध्या नागपुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सध्या पोलिसांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उज्वल भोयर यांनी ही घटना नेमकी कशी आणि कुठे घडली याची माहिती दिली आहे.
नेमकं काय घडलं?
उज्वल भोयर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम दिवस होता. अनिल देशमुख हे त्यांच्या मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सलील देशमुख यांच्या प्रचारासाठी नरखेडमध्ये गेले होते. ही सभा संपल्यानंतर ते कटोलकडे जात असताना रात्री ८.१५ वाजता बेलफाटा या ठिकाणी अनिल देशमुखांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला. बेलफाटाजवळील रस्त्याला एक वळण आहे. त्यामुळे आमच्या गाडीची गती कमी होती. यावेळी चार अज्ञात व्यक्तींनी गाडी अडवली आणि दगडफेक केली.
अनिल देशमुख हे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. यावेळी हल्लेखोराकडून एक मोठा दगड गाडीच्या समोरील काचावर फेकला गेला. यामुळे काचेला तडा गेला. त्यातच अजून एका हल्लेखोराने एक दगड थेट देशमुख यांच्या दिशेने भिरकावला. तो त्यांच्या कपाळावर लागला आणि त्यांना गंभीर जखम झाली. यानंतर आम्ही तात्काळ त्यांना दुसऱ्या गाडीतून कटोल ग्रामीण रुग्णालयात नेले. यादरम्यान रेल्वे फाटक बंद असल्याने थोडा वेळ उशीर झाला. पण प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूरला हलवण्यात आले.
हल्लेखोरांकडू ‘भाजप जिंदाबाद’च्या घोषणा?
मिळालेल्या माहितीनुसार, पारडसिंगाजवळील बेल फाटा परिसरात अंधाराचा फायदा घेत दगडफेक करण्यात आली. गाडीच्या समोरील काचेवर दगडफेक झाल्याने हा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. गाडीच्या समोरची काच फुटली. यावेळी पोलिसांकडून गाडीची तपासणी करण्यात आली. सध्या पोलीस सगळ्या बाजूने तपासणी करत आहे. यावेळी हल्लेखोर “भाजप जिंदाबाद” आणि “अनिलबाबू मुर्दाबाद” अशा घोषणा देत होते, असेही बोललं जात आहे. या हल्ल्यानंतर ते हल्लेखोर दोन मोटारसायकलींवरून भारसिंगी रस्त्याने फरार झाले.