Exit Poll 2024 Results : पश्चिम महाराष्ट्रात मविआचा दबदबा; महायुतीला धक्का, कोणाच्या किती जागा?
पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत त्यापैकी 36 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे.
बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झालं आहे, तर आता शनिवारी म्हणजे 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यापूर्वी एक्झिट पोल समोर आले आहे, अनेक संस्थांनी केलेल्या एक्झिटपोलनुसार राज्यात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही बाजुंच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे एक्झिट पोलच्या आकडेवारीमुळे निवडणूक निकालाबाबत असलेली उत्सुकता आणखी वाढली आहे.
एक्सिसने केलेल्या एक्झिट पोलनुसार महाविकास आघाडीला मराठवाड्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडी जोरदार मुसंडी घेऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत, त्यापैकी महायुतीला 30 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला 15 जागा मिळण्याची शक्यता आहे. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रात याच्या उलट परिस्थिती दिसून येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 48 जागा आहेत त्यापैकी 36 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे, तर 21 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. एका जागेवर अपक्ष उमेदवार आघाडीवर राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान एक्सिसकडून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि मुंबईचा देखील एक्झिट पोल सादर करण्यात आला आहे. एक्सिसच्या पोलनुसार मुंबईमध्ये महायुतीला 22 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीच्या वाट्याला 14 जागा येऊ शकतात. कोकणामध्ये देखील महायुतीचा दबदबा कायम आहे, कोकणात महायुतीचे उमेदवार 24 जागांवर विजयी होऊ शकतात तर महाविकास आघाडीला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात महायुतीला सर्वाधिक 38 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महाविकास आघाडीला केवळ सात जागा मिळू शकतात असा अंदाज आहे.