Satbara Resolution | सातबाऱ्यावरुन जातीचा रकाना हद्दपार! या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी टाकले क्रांतीकारी पाऊल
Satbara Resolution News | सातबाऱ्यावरील जातीचा रकानाच हद्दपार करण्याचा क्रांतीकारक निर्णय घेऊन या ग्रामपंचायती थांबल्या नाहीतर त्यांनी तातडीने निर्णयाची अंमलबजावणी ही केली.
Satbara Resolution News | “जात नाही, ती जात(Caste)“, असे म्हणतात. या सर्व गोष्टींना मोठ्या प्रमाणात फाटा देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांना आणखी बळकटी मिळाली आहे. सातबारा उताऱ्यावरील (Satbara Resolution) शेतीचे स्थानिक नाव या रकान्यात जातिवाचक (Caste Name) नावाचा उल्लेख न करण्याचा पुरोगामी निर्णय महसूल विभागाने गेल्या वर्षी घेतला होता. त्यामुळे गावागावातील जातीची पक्की उतरंड कमी होण्याचा एक मार्ग उघडला होता. महसूल विभागाच्या(Revenue Department) या क्रांतीकारी निर्णयाला आता ग्रामपंचायतीही पाठिंबा देत असल्याचे समोर आले आहे. अनेक ग्रामपंचायतींनी हा क्रांतीकारी विचार उचलूनच धरला नाहीतर त्यावर मार्गाक्रमणही सुरु केले आहे. सातबाऱ्यावरील जातीचा रकानाच हद्दपार करण्याचा निर्णय अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उचलून धरला आणि त्याची अंमलबजावणी ही सुरु केली आहे. या ग्रामपंचायतींचे राज्यात कौतूक केले जात आहे.
या गावांनी घेतला पुढाकार
सातबाऱ्यावरुन जातीचा उल्लेख हटवण्याच्या निर्णयाची अहमदनगर जिल्ह्यातील प्रथम अंमलबजावणी राहाता व नेवासा तालुक्यांत करण्यात आली आहे. यामध्ये राहातामधील बाभळेश्वर व नेवासामधील रामडोह, गोपाळपूर, वरखेड, माळेवाडी दुमला, सुरेगाव दहिगाव, गळनिंब व खामगाव या गावातील ग्रामपंचायतीने याविषयीचे ठराव घेतले. हे ठराव जिल्हाधिकाऱ्यांकडे नुकतेच पाठवण्यात आले. या ठरावांना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे या गावातील 7/12 उताऱ्यावरील जातीची नावे आता हद्दपार होणार आहेत. गावकऱ्यांनी या निर्णयाचे जंगी स्वागत केले आहे.
गेल्या वर्षी घेतला होता निर्णय
समाजात जाती-जातीतील भिंती गळून सामाजिक सलोखा व सौहार्दपूर्ण वातावरण अबाद रहावे यासाठी सातबाऱ्याच्या रकान्यातून जातीचा उल्लेख हटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शासनाच्या महसूल विभागाने 25 ऑगस्ट 2021 रोजी 7/12 उताऱ्यातील ‘शेतीचे स्थानिक नाव’ या रकान्यात दुरुस्तीचा निर्णय घेतला होता. त्यातून जातीचा उल्लेख हटवण्यात आला होता. राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी गावकऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले. 7/12 उताऱ्यावरुन जातीचा कॉलम कमी करण्याचा निर्णय घेतल्याने गावात सामाजिक वातावरण निकोप होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाभळेश्वर ग्रामपंचायतीत ठराव
राहता तालुक्यातील बाभळेश्वर ग्रामपंचायतीने हा विषयीचा ठराव घेतला. 7/12 उताऱ्यात शेतीचे स्थानिक नावामधील महारांचा गट नंबर असा यापू्र्वी उल्लेख करण्यात येत होता. हा उल्लेख हटवून आता बनसोडे यांचा गट नंबर असा उल्लेख 7/12 उताऱ्यात करण्यात आला आहे.