आरोग्य विभागाचा प्रताप, आशा सेविकांना रबराचं लिंग दिलं! मंत्री राजेंद्र शिंगणेंचे कारवाईचे आदेश
आरोग्य विभागाच्या या प्रतापामुळे सरकारची मोठी नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसंच कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
अकोला : कुटुंब नियोजनासाठी (Family Planning) समुपदेशन करणाऱ्या आशा सेविकांना (Asha Workers) आरोग्य विभागानं दिलेल्या किटमध्ये रबरी लिंग देण्यात आलंय! हा प्रकार बुलडाण्यात समोर आलाय. त्यामुळे आशा सेविकांसमोर मोठा पेच निर्माण झालाय. आरोग्य विभागाच्या या प्रतापामुळे महिलांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही या प्रकारावरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. आरोग्य विभागाच्या या प्रतापामुळे सरकारची मोठी नाचक्की होत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे तसंच कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
राजेंद्र शिंगणे हे आज आकोल्यातील कुटासा येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांनी आरोग्य विभागाच्या प्रतापाबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी बोलताना शिंगणे म्हणाले की, यामध्ये कुणी दोषी असेल, कुणी जाणूनबुजून केले असेल, तर अशांवर निश्चितपणे कारवाई केली जाईल. कुटुंब नियोजन हा राष्ट्रीय कार्यक्रम आहे. कुणी त्यात बाधा आणण्याचे काम करत असेल तर जबाबदारी ठरवून कारवाई करण्यात येईल असा इशारा शिंगणे यांनी दिलाय.
आरोग्य विभागाची कबुली
प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हे रबरी लिंग आशा वर्कर्सना देण्यात आले असल्याचं आरोग्य विभागाचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. मात्र ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. हे रबरी लिंग घेऊन ग्रामीण भागातील महिलांसमोर जायचं कसं? या विवंचनेत आशा वर्कर्स असल्याचं पाहायला मिळत आहे. आशा सेविकांशी या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर येऊन सरकार विरोधात बोलायला नकार दिला. मात्र सरकारच्या या अजब कारभारावर महिलांमधून संताप व्यक्त होत आहे.
सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? चित्रा वाघ संतापल्या
हा प्रकार समोर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टॅग करत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी सडकून टीका केली आहे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का..?? उच्छाद मांडलाय लिंगपिसाटांचा… आशांचे हक्काचे कोरोना काळात ठरलेले 35/- रू. रोज कोरोनाची तिसरी लाट ओसरली तरी दिले नाहीतचं.. वर हे अजून…थोडी लाज ठेवा…मेहनती आशा ताईंचे तळतळाट घेऊ नका…असा संताप चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या :