संसार घराबाहेर फेकला, शिवीगाळ करत मारहाण, सावकारी जाचाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात मात्रेवाडीच्या एका शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
उस्मानाबाद : एकीकडे ठाकरे सरकारने राज्यात कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्याची पहिली यादी जाहीर केली आहे. मात्र, दुसरीकडे उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यात मात्रेवाडीच्या एका शेतकऱ्याने खासगी सावकाराच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे (Farmer suicide in Osmanabad). हनुमंत त्रिंबक पवार असं या 55 वर्षीय शेतकऱ्याचं नाव आहे. कर्जवसूलीसाठी खासगी सावकार वारंवार त्रास देत होता. सावकाराची मजल इतपर्यंत गेली की त्याने पहाटेच्या सुमारास येऊन शेतकऱ्याला त्यांच्या कुटुंबासह शिवीगाळ करत मारहाण केली. याने उद्विग्न झालेल्या शेतकऱ्याने अखेर जीवनयात्रा संपवली.
मात्रेवाडी येथे राहणाऱ्या हनुमंत पवार यांना 2 एकर शेती होती. त्यासाठी त्यांनी 2016 मध्ये गावातीलच खासगी सावकार बालम वसुदेव खंडागळे यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपयांचं कर्ज घेतले. या पैशांपोटी त्या सावकाराने हनुमंत पवार यांच्याकडून 2 एकर जमीन पत्नीच्या नावे खरेदी करुन घेतली. इतकं करुनही आरोपी सावकार बालम खंडागळे पैशांचा तकादा लावत पीडित शेतकरी पवार यांना सतत फोन करत.
आरोपी सावकार बालम खंडागळे मंगळवारी (25 फेब्रुवारी) पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास अचानक पीडित शेतकऱ्याच्या घरी आला. त्याने शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत झोपेतून उठवलं. तसेच तात्काळ घर खाली करुन येथून निघून जा अशी धमकी देत मारहाण केली. आरोपी खंडागळेने पवार यांच्या घरातील संसारोपयोगी साहित्य घराबाहेर फेकलं. यावेळी शेतकरी पवार यांच्या मुलाने त्याचे काका दिलीप पवार यांना फोन करुन बोलावले.
दिलीप पवार यांनी पीडित भावाला सावकाराच्या मारहाणीतून वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी गावातीलच रामदास तुळशीराम खंडागळे, हरिदास तुळशीराम खंडागळे, नाना बालम खंडागळे, आशाबाई बालम खंडागळे हे तेथे आले. त्यांनीही पवार यांच्या कुटुंबाला पैसे द्या नाही, तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर या जाचाला कंटाळून पवार यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
या प्रकरणी मृताचा भाऊ दिलीप पवार यांच्या तक्रारीवरुन भूम पोलीस ठाण्यात बालम खंडागळे, अंकुश खंडागळे, नाना बालम खंडागळे, आशाबाई खंडागळे, हरिदास खंडागळे, रामदास खंडागळे या 6 जणांच्या विरोधात कलम 306, 323, 506, 143, 147 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सर्व आरोपी फरार आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
Farmer suicide in Osmanabad