Beed : रानडुकराशी तब्बल पाऊण तास कडवी झुंज! 62 वर्षांचा शेतकरी रानडुकरावर पडला भारी
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली असून खरिपाचा पेरा बाकी आहे. शेतामध्ये फक्त काळे वावर आहे. त्यामुळे पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात असलेली रानटी डुकरे ही थेट लोकवस्तीमध्ये घुसत आहे. यातच बीडातील मौजवाडी शिवारात रानडुकरांचा वावर वाढलाय. असे असताना मौजवाडीतील लक्ष्मण ढेंबरे हे नेहमीप्रमाणे सकाळच्या प्रहरी दूध घेऊन निघाले होते. दरम्यान, गाव जवळ येताच त्यांच्यावर डुकराने हल्ला चढिवला.
बीड : (Wild animal) वन्य प्राण्यांचा उपद्रव, प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान हा विषय बातमी पर्यंतच मर्यादित राहतो. पण आता शेतात पिके नसताना देखील (Beed) बीड जिल्ह्यात चर्चा आहे ती रानडुकराने (Farmer) शेतकऱ्यावर चढविलेल्या हल्ल्याची. अहो घटनाच तशी घडलीयं. सध्या शेत शिवारात पीक उभे नसल्याने वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा हा लोकवस्तीकडे वळविला आहे. तालुक्यातील मौजवाडीमध्ये रानटी डुकर हे गावात शिरले अन् त्याने एका शेतकऱ्यावर हल्लाही चढविला. यामध्ये 62 वर्षीय शेतकऱ्यांनेही माघार न घेता डुकराला आवळून अक्षरश: लोळवले. जीव वाचविण्यासाठी 62 वर्षीय शेतकऱ्यांने रानडुकाराला कडवी झुंज दिली. तब्बल पाऊन तास सुरु असलेल्या या झुंजीमध्ये गावकऱ्यांनी रानडुकराला ठार मारुन शेतकऱ्याची सुटका केली. यामध्ये शेतकरी लक्ष्मण ढेंबरे हे देखील जखमी झाले आहेत.
नेमकी घटना घडली तरी कशी?
सध्या रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली असून खरिपाचा पेरा बाकी आहे. शेतामध्ये फक्त काळे वावर आहे. त्यामुळे पाण्याच्या आणि चाऱ्याच्या शोधात असलेली रानटी डुकरे ही थेट लोकवस्तीमध्ये घुसत आहे. यातच बीडातील मौजवाडी शिवारात रानडुकरांचा वावर वाढलाय. असे असताना मौजवाडीतील लक्ष्मण ढेंबरे हे नेहमीप्रमाणे सकाळच्या प्रहरी दूध घेऊन निघाले होते. दरम्यान, गाव जवळ येताच त्यांच्यावर डुकराने हल्ला चढिवला. पण 62 वर्षीय लक्ष्मण ढेंबरे यांनीही कडवी झुंज दिली. त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी सर्वकाही पणाला लावून रानडुकराशी दोन हात केले. तब्बल पाऊन तास रानडुक्कर हे त्यांच्यावर हल्ला करीत होते तर ढेंबरेही स्वत:चा बचाव करीत होते. मात्र, रानडुकर माघार घेत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी डुकाराला ठार केले आणि ढेंबरे यांचा जीव वाचविला. अखेर पाऊन तासानंतर ही सुरु असलेली झुंज संपली.
शेतकरी लक्ष्मण ढेंबरेही गंभीर जखमी
62 वर्षीय लक्ष्मण ढेंबरे यांच्यावर हल्ला होताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही केल्याने रानडुकर हे हल्ला करण्याचे सोडत नव्हते. ग्रामस्थांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला पण त्यांचेही प्रयत्न निष्फळ ठरले. यामध्ये ढेंबरे यांच्या जीवाला काही होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी डुकराला ठार केले. रानडुकराच्या या हल्ल्यामध्ये ढेंबरे हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही उपचार सुरु आहेत.
पार अन् कुऱ्हाडीने केले रानडुकराला ठार
रानडुकराने चढविलेल्या हल्ल्यात शेतकरी लक्ष्मण ढेंबरे हे रक्तभंबाळ झाले होते. यामध्ये त्यांच्या जीवीताला धोका निर्माण होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी प्रसांगवधान दाखवून रानडुकरावर हल्ला केला. गावकऱ्यांनी पार आणि कुऱ्हाडीने त्यावर हल्ला केला आणि ढेंबरे यांचा जीव वाचविला. घटनास्थळी रानडुकराचा मृत्यू झलाा तर ढेंबरे हे गंभीर जखमी अवस्थेत होते. जिल्हाभर या झुंजीचा विषय चर्चेला जातोय.