शेतकऱ्यांना अॅमेझॉन आणि रिलायन्सची भीती वाटते- शरद पवार
या कंपन्या आता शेतकऱ्यांना सांगेल तो भाव देतील. ते बाजारपेठेतील इतर प्रतिस्पर्ध्यांना संपवतील.| Sharad Pawar Farm bills
तुळजापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे मोठ्या कंपन्या बाजारपेठेत उतरतील. या कंपन्या शेतीमाल विकत घेणाऱ्या इतर प्रतिस्पर्ध्यांना संपवून टाकतील. यानंतर आपल्याला मिळेल त्या भावाने या कंपन्यांना शेतमाल विकावा लागेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले. (Shard Pawar on farm bills)
ते सोमवारी तुळजापुरातील पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी विधेयकांबाबत शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. यावर शरद पवार यांनी शेतकऱ्यांना मोठ्या कंपन्यांची भीती वाटत असल्याचे सांगितले. अमेझॉन ही जगातील मोठी कंपनी आहे. तर रिलायन्सदेखील भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कृषी कायद्यांमुळे शेतकरी या कंपन्यांना थेट माल विकू शकतील. या कंपन्या आता शेतकऱ्यांना सांगेल तो भाव देतील. ते बाजारपेठेतील इतर प्रतिस्पर्ध्यांना संपवतील. यानंतर या कंपन्या सांगतील त्या भावाने आपल्याला शेतमाल विकावा लागेल, अशी भीती शेतकऱ्यांना वाटते.
काही दिवसांपूर्वी शेतमालाचा हमीभाव कायम राहील, असे सरकारकडून सांगण्यात आले. परंतु, सरकारने त्याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी कायद्यातच स्पष्टपणे तशी तरतूद करावी, असा पर्याय शरद पवार यांनी सुचवला.
मनमोहन सिंह सरकारच्या काळात रिटेल क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीला मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी भाजपने देशातील लहान दुकानदारांना एकत्र करुन आंदोलन केले होते. याचा भाजपला आता विसर पडला असेल, अशी खोचक टिप्पणीही शरद पवार यांनी केली.
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी अतिवृष्टीमुळे राज्यावर आजपर्यंतचे सर्वात मोठे आर्थिक संकट ओढावले आहे. या आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने कर्ज काढून त्यांना मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत विनंती करणार आहोत. राज्य सरकारने जास्तीत जास्त कर्ज काढावे, असेही पवार यांनी म्हटले.
‘उस्मानाबादमध्ये अनेकांची शेतीच वाहून गेलेय’ राज्यातील अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये नुकसानीची टक्केवारी जास्त आहे. उस्मानाबादमध्ये काही ठिकाणी नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने हे पाणी शेतीत शिरले. त्यामुळे या भागातील शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. पीक गेल्यास त्याचा फटका एका वर्षासाठी असतो. मात्र, शेतजमीनच उद्ध्वस्त झाल्यास त्यामधून बाहेर पडण्यास शेतकऱ्यांना बराच कालावधी लागेल, असे शरद पवार यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी
(Shard Pawar on farm bills)