फेंगल चक्रीवादळाचा दक्षिण भारतात धुमाकूळ, महाराष्ट्रावरही दिसणार परिणाम
आता फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी आठवडाभरासाठी विश्रांती घेणार आहे. तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra Fengal Cyclone Affect : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘फेंगल’ चक्रीवादळ सध्या दक्षिण भारतात धुमाकूळ घालत आहे. यामुळे तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक यांसह दक्षिणेतील अनेक राज्यांना मोठा फटका बसला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आता महाराष्ट्रावर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात गारठा वाढला होता. अनेक ठिकाणी तापमान हे १० अंशाच्या खाली गेले होते. मात्र आता फेंगल चक्रीवादळामुळे राज्यातील थंडी आठवडाभरासाठी विश्रांती घेणार आहे. तर यामुळे काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्रात आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार आहे. मुंबईत काल १७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळाचा विपरीत परिणाम महाराष्ट्रात होणार आहे. यामुळे येत्या २ डिसेंबरपासून ते ५ डिसेंबरपर्यंत राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या चक्रीवादळामुळे राज्याच्या दक्षिण भागात ढगाळ वातावरण नोंदवण्यात आले आहे. त्यामुळे थंडी कमी झाली आहे.
Cyclonic Storm “FENGAL” over Southwest Bay of Bengal near latitude 11.8°N and longitude 81.7°E, about 210 km southeast of Chennai. To move west-northwestwards and cross north Tamil Nadu-Puducherry coasts between Karaikal and Mahabalipuram close to Puducherry as a cyclonic storm… pic.twitter.com/eks11Nv31k
— India Meteorological Department (@Indiametdept) November 29, 2024
चक्रीवादळामुळे वाऱ्याचा पॅटर्न बदलला
राज्यात आठवडाभरासाठी थंडी विश्रांती घेणार आहे. तर दुसरीकडे रविवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदवण्यात आले आहे. सध्या नाशिकमध्ये थंडीचा कडाका काही अंशी घटला आहे. नाशिकमधील कमाल आणि किमान तापमानात काही अंशानी वाढ झाली आहे. यामुळे नाशिकसह राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला थंडीचा कडाका फार जाणवणार नाही.
फेंगल चक्रीवादळामुळे वाऱ्याचा पॅटर्न बदलला आहे. यामुळे राज्यासह उत्तर महाराष्ट्रात ढगाळ हवामान पाहायला मिळेल. या नव्या चक्रीवादळाने हवेतील आर्द्रता बदलण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
जालन्यात पिकांवर परिणाम
तसेच जालना जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसापासून ढगाळ वातावरण असल्यामुळे हरभरा यासह इतर रब्बी हंगामातल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. जालना जिल्ह्यात सर्वच ठिकाणी तुरीचे पीक सध्या जोमात असल्याने 4 पैसे पदरी पडतील अशी आशा शेतकरी वर्ग व्यक्त करत होता. मात्र बदलत्या वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हातातोंडाशी आलेली पिके हातातून जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
मुंबईसह दिल्लीत हवामान बदलामुळे आजारांमध्ये वाढ
मुंबईसह दिल्ली शहर सध्या धुक्याने वेढलं आहे. मुंबईतील AQI ‘मध्यम’ ते ‘खराब’ श्रेणीत पोहोचला आहे. एक्युआय १५३ वर आहे. तर पीएम २.५ चं प्रमाण ७४ इतकं नोंद झालं आहे. मुंबईत धुराची पातळी मध्यम स्थितीत आहे. या दोन्ही शहरांचा एक्यूआय चिंतेचा विषय आहे. मुंबईचा काही भाग सध्या धुक्याने अच्छादला आहे. धुक्याचा थर पातळ असला तरी, हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ श्रेणीत आहे.
या हवामानामुळे शहरात मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया म्हणजे वॉकिंग न्यूमोनिया’चा आजार पसरत आहे. यामुळे लोक जास्त संख्येने संक्रमित होत आहेत हा रोग सामान्यतः लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये आढळतो, मात्र आता वयस्कांमध्येही नोंद होतं आहे. मुंबईतील हवेची गुणवत्ता काही दिवसांपासून खालावली असून ती गंभीर पातळीवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे अनेकांमध्ये विविध आजार उद्भवताना दिसत आहेत. त्यामुळे रुग्णालयात रुग्णसंख्येतही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.