Maharashtra night curfew update : जमावबंदीचा पहिला दिवस, कोणत्या जिल्ह्यात काय कारवाई ? लोकांचा प्रतिसाद कसा?
राज्यात काही ठिकाणी सरकारच्या जमावबंदीच्या आदेशाचे उत्स्फूर्तपणे पालन केले गेले. तर काही ठिकाणी प्रशासनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. (maharashtra night curfew district update)
मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढली तर आगामी काळात संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे सध्याची परिस्थिती पहाता राज्य सरकारने आजपासून (28 मार्च) संपूर्ण राज्यात रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. सरकारच्या या आदेशानुसार राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत रोज जमावबंदीचा आदेश लागू असेल. जमावबंदीचा पहिला दिवस असल्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांत या आदेशाचे पालन केले गेले. सर्व जिल्ह्यातील पोलीस आणि इतर यंत्रणा जमावबंदीच्या आदेशाचा अवलंब करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. त्यामुळे आज राज्यात काही ठिकाणी सरकारच्या जमावबंदीच्या आदेशाचे उत्स्फूर्तपणे पालन केले गेले. तर काही ठिकाणी प्रशासनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. (first day of Maharashtra night curfew on increase in Corona patient all district detail update)
नागपुरात चौका-चौकात नाकाबंदी
28 मार्चपासून जमाबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे नागपूर प्रशासनाने या आदेशाचे पालन करणे सुरु केले आहे. 28 मार्चच्या रात्री 8 वाजेपासून नागपूर पोलीस रस्त्यावर उतरले. पोलिसांनी चौका-चौकात नाकाबंदी केलेली आहे. तसेच यावेळी बाहेरुन येणाऱ्यांची तपासणी केली जात आहे. वाहनांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जात आहे की नाही?, याचीसुद्धा यावेळी पाहणी केली जात आहे. नागरिकांनी मास्क किंवा सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
मुंबईत जुहू चौपाटीवर रोजच्यासारखी गर्दी नाही
मुंबईत 28 मार्च हा नाईट कर्फ्यूचा पहिला दिवस असल्यामुळे जुहू चौपाटीवर रोजच्यासारखी गर्दी नव्हती. दरवर्षी होळीच्या दिवशी मुंबईच्या जुहू चौपाटीवर पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. मात्र, रविवारी संध्याकाळी या ठिकाणी पर्यटकांची गर्दी नव्हती. 28 मार्चच्या रात्री आठ वाजेपासून नाईट कर्फ्यूला सुरुवात झाल्यामुळे येथे गर्दी नव्हती. तसेच मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेने संध्याकाळी जुहू चौपाटीवरील नागरिकांना घरी जायला सांगित्यामुळेसुद्धा येथे नागरिक नव्हते.
ठाण्यात जमावबंदीला चांगला प्रतिसाद
राज्य शासनाच्या जमावबंदीच्या आदेशानुसार ठाण्यात प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या. 28 मार्च रोजी रात्रीचे आठ वाजेपासून ठाण्यातील मुख्य बाजारपेठेतील व्यापारी दुकाने बंद करण्यात आली होती. तसेच रात्री आठच्या नंतर येथील गर्दीसुद्धा ओसरली होती. ठाण्यात अटी आणि नियम न पाळल्यास पोलीस दलाकडून कारवाई करण्यात येत असल्यामुळे बहुतांश ठिकाणी नागरिकांकडून जमावबंदील चांगला प्रतिसाद मिळत आहे.
रायगडमधील खोपालीत हॉटेल्स, दुकाने सुरुच
राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले असले तरी रायगड जिल्ह्यातील खोपोली या भागात रात्रीच्या आठ नंतरसुद्धा अनेक हॉटेल्स आणि दुकाने सुरुच होते. या भागात पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्यामुळे येथे जमावबंदीच्या आदेशाचे पालन तेवढ्या क्षमतेने झाले नाही. येथे जमावबंदीला संमिश्र प्रतिसाद मिळाला.
चंद्रपूर जिल्ह्यात जमावबंदीचे काटेकोरपणे पालन केले जाणार
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. येथे सलग तिसऱ्या दिवशी 300 हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आलीये. त्यामुळे राज्यात रात्री 8 वाजेनंतरच्या जमावबंदीचे येथे पालन केले जात आहे. 28 फेब्रुवारी हा जमावबंदीचा पहिलाच दिवस असूनही येथे पोलीस पथकाने रात्री आठ वाजता सर्व दुकाने केली बंद केली होती. कुठलीही अप्रीय घटना टाळण्यासाठी रोज रात्री आठ वाजेनंतर येथे पोलीस जमावबंदीच्या आदेशाची कठोरपणे अंमलबजानवणी केली जाणार आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये जमावबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड शहरात रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंतच्या जमावबंदीला शहरातील व्यापारी, दुकानदार, आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रात्री आठ वाजता शहरातील सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या होत्या. तसेच जमावबंदीचे आदेश पाळण्यासाठी शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथे रस्तावरुन विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद दिला जातोय.
दरम्यान, राज्यात जमावबंदीचे आदेश लागू झाल्यामुळे पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच या काळात सर्व सार्वजनिक ठिकाणं तसेच बीच, गार्डन हे बंद असणार आहेत. या आदेशाचे ज्या नागिकांकडून उल्लंघन होईल त्यांच्याकडून 1000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.
इतर बातम्या :