महिलेला विहिरीत ढकललं आणि… नांदेडमध्ये धुडगूस घालणाऱ्या वानराला अखेर पकडले
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये वानराच्या टोळक्याने धुडगूस घातला होता. या वानरांच्या मस्तीमुळे एका महिलेचा जीव धोक्यात आला होता. मात्र, महिला थोडक्यात बचावली.

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded) उच्छाद घालणाऱ्या वानरांच्या टोळीतील प्रमुख वानर अखेर जेरबंद झाला आहे. वानराला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी या वानराने एका महिलेला विहिरीत ढकललं होते. वानरांच्या या टोळक्याच्या कृत्यांमुळे नागरीकांमध्ये दहशत पसरली होती.
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील नांदगावमध्ये वानराच्या टोळक्याने धुडगूस घातला होता. या वानरांच्या मस्तीमुळे एका महिलेचा जीव धोक्यात आला होता. मात्र, महिला थोडक्यात बचावली.
ही महिला विहिरीवर पाणी भरत असताना या टोळीतील एका वानराने या महिलेला विहिरीत ढकलून दिलं होते. विहिरीच्या जवळ उपस्थित असलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखलं आणि विहिरीत पडलेल्या या महिलेला बाहेर काढलं. त्यामुळे थोडक्यात मोठा अनर्थ टळला. नशीब बलवत्तर म्हणून ही मला थोडक्यात बचावली आहे.
वानरांच्या या टोळीने गावात हैदोस घातला होता. या वानरांनी गावातील सहाजणांना चावा घेतला होता. तर अनेकांवर या वानरांनी हल्ला केला होता. गेल्या दोन महिन्यांपासून वानरांचा धुमाकूळ सुरू होता. वानरांच्या त्रासामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. ग्रामस्थांनी वन विभागाकडे तक्रारी करत वानरांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
अखेर या तक्रारींची दखल घेत वन विभागाने वानरांचे सर्च ऑपरेशन केले. तीन दिवसानंतर वन विभागाच्या पथकाने टोळीतील एका वानराला पकडले आहे. मात्र, टोळीत अन्य वानर पळून गेले आहेत. या टोळीतील प्रमुख वानर जाळ्यात अडकलाय. या वानरांमुळे ग्रामस्थ दहशतीत होते. मात्र, यातील प्रमुख वानर वन विभागाच्या जाळ्यात अडकल्याने नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.