Uddhav Thackrey : उद्या महाराष्ट्र बंद… उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांना सूट काय?; काय लगावला टोला?
बंद हा बंद असतो. नागरिकांना विनंती करतोय बंदमध्ये सहभागी व्हा. उच्च न्यायालयाने बदलापूरच्या घटनेची दखल घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता घटनेची दखल घेतली आहे. त्यामुळेच आता जनतेनेही बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करण्याचा निर्णय घेतला आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन या बंदबाबतची माहिती दिली. बंद किती वाजेपर्यंत असेल याचीही माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच बंदमध्ये बसेस आणि लोकल बंद ठेवल्या पाहिजे, असं सांगतानाच बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. मातोश्री येथे पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही टोला लगावला.
उद्याचा बंद राजकीय हेतूने प्रेरित नाही. उद्याचा बंद हा सामाजिक मुद्द्यावरचा आहे. हा विषय सर्वांचा आहे. ज्यांना ज्यांना आपल्या मुलीबाळींची चिंता आहे. त्या सर्वांनी या बंदमध्ये सहभागी व्हायचे आहे. नराधमांच्या पाठिराख्यांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये. त्यांचं या बंदमध्ये काही काम नाहीये, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक सूटही दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
अत्यावश्यक सेवा वगळल्या
बंदमधून आम्ही अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत. दुपारपर्यंतच हा बंद असेल. पोलिसांनी या बंदच्या आड येऊ नये. बाकी मुख्यमंत्री रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला जाऊ शकतात. कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मते देण्यासाठी आहेत. बहिणीची किंमत ही मतं आहे. पण आमच्यासाठी बहीण हे नातं आहे. आम्ही नातं जपणारी माणसं आहोत. तुम्हाला वाटत असेल बहिणीची मते विकत घेऊ शकता, तर बहीण ही विकाऊ नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
हिंसा होऊ नये ही इच्छा
उद्याच्या बंद दरम्यान हिंसा होऊ नये ही आमची इच्छा आहे. त्यामुळे पोलिसांनी या बंदच्या आड येऊ नये. नागरिकांना शांततेत बंद करू द्या. राज्याच्या पोलीस महासंचालिका या महिला आहे. मला वाटतं त्या कदाचित पहिल्याच महिला पोलीस महासंचालिका असाव्यात. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची लाडकी बहीण बनण्याची संधी आहे. त्यांनी पोलिसांना आदेश द्यावेत. उद्याच्या बंदच्या आड येऊ नका म्हणून सांगावं, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
दुकानदारांनाही कुटुंब आहे
आम्ही बंदमध्ये कायदा हातात घेणार नाही. बंद म्हणजे बंद आहे. पण कायदा आमचं रक्षण करत नसेल तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. दुकानदारांना सुद्धा कुटुंब आहे. त्यांच्याही मुली शाळेत जात असेल. लहान मुलींपासून सर्व वयाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही उद्या दुपारपर्यंत बंद ठेवला पाहिजे, असं सांगतानाच बंदच्या विरोधात कोर्टात गेलेल्यांना माताभगिनींची चिंता नसेल. ही जनभावना आहे. जनभावनेच्या आड नराधमाची पाठराखण करणाऱ्यांनी येऊ नये, असं ते म्हणाले.