चर्चा तर होणारचः नांदगावचे माजी आमदार संजय पवार पुन्हा राष्ट्रवादीमध्ये; शिवसेना, भाजप असे वर्तुळ पूर्ण
नागापूरसारख्या ग्रामीण भागातील सामान्य शिवसैनिकाला सेनेने आमदार पदापर्यंत पोहचवले. संजय पवार हे 2004 ते 2009 या काळात शिवसेनेचे आमदार होते.
येवलाः नांदगावचे माजी आमदार संजय पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आज गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस असे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण केले आहे. नगरपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवेश केल्याने त्याला महत्त्व आले आहे.
बाळासाहेबांचे परमभक्त
खरे तर संजय पवार हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे परमभक्त व शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जात. नागापूरसारख्या ग्रामीण भागातील सामान्य शिवसैनिकाला सेनेने आमदार पदापर्यंत पोहचवले. संजय पवार हे 2004 ते 2009 या काळात शिवसेनेचे आमदार होते. मात्र, त्यापुढील पंचवार्षिक निवडणुकीत आमदार पंकज भुजबळ यांच्याविरोधात भुजबळ पिता पुत्रांना जबरदस्त लढत देत संजय पवार निवडणूक लढले. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत मनमाड येथील प्रचार सभेला पक्ष नेते उद्धव ठाकरे आले नाहीत, हा मुद्दा चर्चेचा विषय ठरला होता. पंकज भुजबळ निवडून आले आणि त्यानंतर संजय पवार यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काही वर्षे भुजबळांसोबत राहिल्यावर ते पुन्हा स्वगृही परतले होते.
राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप प्रवास
शिवसेनेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुहास कांदे यांच्यासह तालुक्यात सेनेच्या विविध आंदोलनात पवार यांनी सहभाग घेतला. मात्र, नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर नाट्यपूर्ण घडामोडीतसंजय पवार यांनी अचानक सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत भाजपवासी होण्याचा निर्णय घेतला होता. आपल्यासोबत आणखी काही पदाधिकारी असल्याचा दावा करत 23 ऑक्टोबर 2016 रोजी शिर्डी येथे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या भाजप प्रवेशाने नांदगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढेल असा सूर व्यक्त झाला होता.
आता पुन्हा राष्ट्रवादीत…
माजी आमदार संजय पवार भाजपमध्येही जास्त काळ रमले नाहीत. त्यामुळे त्यांनी आता ऐन नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उडी मारली आहे. त्यांच्या या पक्षांतराने शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप आणि पुन्हा राष्ट्रवादी असे पक्षांतराचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. मात्र, आता अखेरपर्यंत भुजबळांसोबत राहू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्याः
रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवारांचं पहिल्यांदाच उत्तर; सांगलीत वाद चिघळणार?