मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, भाजपचे नेते मोहित कंबोज (mohit kamboj) आणि फोन टॅपिंग प्रकरणातील आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी आज सागर बंगल्यावर जाऊन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची भेट घेतली होती. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणारे परमबीर सिंह हे दुसरे पोलिस अधिकारी आहेत.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती.
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सीबीआयने या प्रकरणातील प्राथमिक तपासानंतर अनिल देशमुख आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान परमबीर सिंह यांना देखील निलंबीत करण्यात आले.
गुरुवारी रात्री उशीरा परमबीर सिंह यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दोघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं चर्चा झाल्याचे समजते.
महाविकास आघाडी काळामध्ये परमवीर सिंग यांचं निलंबन झालेलं होते. त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती त्यांनी शंभर कोटी वसुली प्रकरणांमध्ये अत्यंत गंभीर असे भ्रष्टाचाराचे आरोप केलेले होते.
चांदीवाल आयोगामध्ये हे प्रकरण सुरू होते. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये ते वादग्रस्त अधिकारी ठरलेले आहेत.
परमबीर सिंह आता पुन्हा एकदा आता कमबॅक करण्याचा प्रयत्नात असल्याचे समजते. यामुळे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.