तुमच्या भांडणात फाटक्या शिवसैनिकाचं स्वप्न कधी पूर्ण होणार? शिवसेनेचे माजी खासदार अॅड शिवाजी माने यांचा सवाल!
शिवाजी माने हे हिंगोलीतून दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा खासदार (Hingoli MP) राहिले आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी (Maharashtra politics) पक्षात गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे.

हिंगोलीः महाराष्ट्रात सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या गंभीर आरोप प्रत्यारोपांवर शिवसेनेचे माजी खासदार अॅड. शिवाजीराव माने (Shivaji Mane) यांनी मोठी खंत व्यक्त केली आहे. शिवाजी माने हे हिंगोलीतून दोन वेळा शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा खासदार (Hingoli MP) राहिले आहेत. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रावादी (Maharashtra politics) पक्षात गेल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजप शिवसेनेने परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करणे थांबवावे. तसेच शिवसेना मोठी करणाऱ्या नारायण राणेनी किती खून केले, काय गुन्हे केले, हेही आता काढू नये, अशी विनंती शिवाजी माने यांनी केली आहे. तसेच या भांडणात सामान्य शिवसैनिकांचे प्रश्न मागे राहत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. रविवारी त्यांनी एक ही खंत व्यक्त करणारा व्हिडिओ सोशल माध्यमावर टाकला. त्यानंतर तो प्रचंड व्हायरल होत आहे.
काय म्हणाले शिवाजी माने?
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी रविवारी एक व्हिडिओ शेअर करून आपल्या मनातील खंत व्यक्त केली. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात एक सामान्य म्हणून शिवसैनिकाच्या मनात चालला आहे, तो एक शिवसैनिक या नात्याने मी तुमच्यासमोर मांडत आहे. खरं म्हणजे शिवसेना आणि भाजपकडून जे काही आरोप प्रत्यारोप चालले आहेत. हे कुणालाही रुचण्याजोगं आणि पचण्याजोगं नाहीये. एवढी वाईट स्थिती आजपर्यंत महाराष्ट्रात कधीही आलेली नव्हती. एवढी ही राजकीय परिस्थिती खालच्या स्तराला गेलीय असं म्हणलं तर वावगं होणार नाही. खरं म्हणजे राणे साहेबांनीही मातोश्रीवर बोट दाखवायचं कारण नाही आणि शिवनसेनेनेही राणे साहेब काय होते, त्यांचा पूर्वीचा इतिहास काय त्यांनी पूर्वी काय केले, किती खून केले, हे काढण्याचं कारण नाही…अशी विनंती शिवाजी माने यांनी केली.
फाटक्या शिवसैनिकांचं स्वप्न कधी पूर्ण होणार?
शिवाजी माने यांनी व्हिडिओत पुढे म्हटलं, ‘ मला सांगा, हेच राणेसाहेब आहे, पूर्वी ज्यांच्या रक्तातून आणि घामातून शिवसेना मोठी झाली आहे. खरं म्हणजे या सगळ्या गोंधळात फाटक्या शिवसैनिकांत संभ्रम निर्माण होत आहे. शिवसेना ही फाटक्या शिवसैनिकांतून पुढे आली, असे आपण म्हणतो. या शिवसैनिकांचं स्वप्न कधी पूर्ण होणार आहे? त्यांच्याबद्दल कुणी काही विचार करणार आहे का नाही? आज हे एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढतायत. याची संपत्ती किती, त्याची संपत्ती किती? अरे ज्याच्या रक्ता-मासावरती एवढे मोठे झालात, त्याच्याबद्दल खरं तर सरकारनी काहीतरी करावं, ही त्यामागची अपेक्षा आहे. आणि महाराष्ट्रात जो काँग्रेसच्या विचारांचा आणि काँग्रेसच्या विरुद्ध विचारांचा स्पष्ट प्रवाह होता, शिवसेना ही काँग्रेसच्या विचारांच्या विरुद्ध लढत होती. आमचेही व्रण अजून जिरलेले नाहीत. केसेस मिटलेल्या नाहीत. एवढं या शिवसैनिकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात सोसलं आहे. दुर्दैवं एवढं की भाजप आणि शिवसेना ही त्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात तीळमात्र बोलायला तयार नाही. आम्ही मात्र भाजप-शिवसेना एकमेकांविरोधात लढतोयत. हा सर्व तमाशा काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले रिंगणाच्या बाहेरून पहात आहेत. हे मराठी माणसाला पहावत नाही. हे कुठं तरी थांबलं पाहिजे, एवढंच मला या माध्यमातून सांगायचं आहे.
कोण आहेत शिवाजी माने?
अॅड. शिवाजी माने हे हिंगोली जिल्ह्यातील ज्येष्ठ शिवसेना नेते आहेत. 1996 ला शिवसेना तिकिटावर खासदार झाले. दोन वेळा त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकी भूषवली. 2004 मध्ये मात्र लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2006 मध्ये त्यांनी या परभवासाठी शिवसेनेचे स्थानिक नेते जबाबदार असल्याची उघड भूमिका मांडली. 2008 ला ते काँग्रेसमध्ये गेले. काँग्रेसने त्यांना जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली होती, त्या वेळी त्यांनी काँग्रेसचे बहुसंख्य जिल्हा परिषद सदस्य निवडून आणले होते. नंतर काँग्रेसमध्ये राजीव सातव अॅक्टिव्ह झाले. त्यामुळे पक्षात माने आणि सातव यांचे जमत नसल्याने माने यांनी 2014 साली काँग्रेसला राम राम ठोकला व राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. 2015 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने माने यांना एकही तिकीट दिले नसल्याने माने पुन्हा नाराज झाले व त्यांनी 2015 ते 2019 पर्यंत त्यांनी राष्ट्रवादीत दिवस काढले. पुन्हा 2019 च्या निवडणुकीत घर वापसी केली आमदार संतोष बांगर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आखाडा बाळापूर येथे सभे साठी आले असता त्यांनी भर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला आता ते सध्या शिवसेनेत आहेत.
इतर बातम्या-