ठाकरे सरकारमध्ये सांगलीच्या जावईबापूंची चलती, चौघांना मंत्रिपद
ठाकरे मंत्रिमंडळात सांगलीतील चार जावयांची वर्णी लागली. यामध्ये राष्ट्रवादीचे दोघे, काँग्रेसचे एक, तर एक अपक्ष आमदार आहेत.
सांगली : मंत्र्यांची निवड आणि खातेवाटप करताना प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षाकडून होत असतो. मात्र ठाकरे सरकारच्या बाबतीत एक वेगळाच योगायोग जुळून आला. चक्क एकाच जिल्ह्यातील चार जावई (Ministers Son in Law of Sangli) महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सांगली जिल्ह्यातील चार जावयांची वर्णी लागली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे दोघे, काँग्रेसचे एक, तर एक अपक्ष आमदार आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील हे जिल्ह्याचे सुपुत्र आणि जावई अशा डबल रोलमध्ये आहेत.
याशिवाय, राष्ट्रवादीचेच मंत्री धनंजय मुंडे, काँग्रेसचे मंत्री बाळासाहेब थोरात, आणि शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर असे अन्य तीन जावई मंत्रिमंडळात असतील.
कॅबिनेट मंत्री जयंत पाटील हे मिरज तालुक्यातील म्हैसाळचे जावई. माजी आमदार स्वर्गीय मोहनराव शिंदे हे त्यांचे सासरे. ज्येष्ठ नेते राजारामबापू पाटील यांचे सुपुत्र असलेले जयंत पाटील शैलजा शिंदे यांच्याशी लग्न झाल्यानंतर सांगलीचे जावईही झाले.
ना जयंत पाटील, ना वळसे पाटील, पवारांकडून गृहमंत्रिपदी ‘यांची’ निवड
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्रिपदावर वर्णी लागलेले बाळासाहेब थोरात हे वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे जावई. राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील हे मंत्री थोरातांचे मेहुणे आहेत. जिल्ह्याच्या दोन जावयांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळालं होतं. त्यांच्याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारात आणखी दोन जावई मंत्रिपदावर आरुढ झाले आहेत.
बेडग (ता. मिरज) गावच्या खाडे घराण्याचे जावई धनंजय मुंडे यांना कॅबिनेट, आणि अपक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना शिवसेनेच्या कोट्यातून अनपेक्षितपणे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. ते वसगडे (ता. मिरज) गावातील जनगोंडा पाटील यांचे जावई आहेत. त्यांच्या पत्नी स्वरुपा यांनी जयसिंगपूरचे नगराध्यपद दीर्घकाळ भूषवले आहे. यड्रावकरांचा सांगलीशी तसा जुना संबंध. त्यांच्या दोन्ही बहिणी सांगलीतील गावभागात आहेत. त्या सख्ख्या बहिणी आणि सख्ख्या जावा आहेत.
याआधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या रुपाने जिल्ह्यातील जावयाचा राज्याच्या सर्वोच्चपदी गौरव झाला होता. त्यांची सासरवाडी बेडग (ता. मिरज). धनंजय मुंडे हेही त्याच गावचे जावई. तर आमदार विनय कोरे यांचे आजोळही त्याच गावात आहे. मात्र एकाच वेळी चार गावांचे जावई मंत्रिपदी (Ministers Son in Law of Sangli) गेल्याने सांगलीकरांची कॉलर टाईट झाली आहे.