चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू, पोहण्यासाठी बॅरेजच्या पाण्यात उतरले नि घात झाला
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
व्यंकटेश दुडमवार, प्रतिनिधी, गडचिरोली : उन्हाचे दिवस असल्याने बहुतेक साऱ्यांना पाण्यात मनसोक्त भिजावेसे वाटते. उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंश डिग्री सेल्सीअसपर्यंत गेलाय. उष्णतेमुळे शरीराची लाही लाही होते. चार युवक फिरायला गेले होते. त्यांना पोहण्याचा मोह अनावर झाला. त्यामुळे ते चीचहोड येथील बॅरेजच्या पाण्यात खाली उतरले. आतमधील पाण्याचा अंदाज आला नाही. चौघेही बुडाले.
जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या चीचडोह बॅरेजच्या दरवाज्याखालील खोलगट भागात पोहण्यासाठी चार युवक गेले होते. या चार युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली. मोनू त्रिलोक शर्मा (26), प्रफुल विठ्ठल येलुरे (20), शुभम रुपचंद लांजेवार (24), महेश मधुकर घोंगडे (20) सर्व रा. कृषक हायस्कूल जवळ चामोर्शी असे मृतकांची नावे आहेत.
पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले
चार युवक चीचडोह बॅरेजवर फिरायला गेले होते. त्या युवकांना पोहण्याचा मोह झाल्याने ते बॅरेजच्या पाण्यात उतरले. अशातच चार युवक खोलगट भागात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
बचाव पथकाने काढले मृतदेह
घटनेची माहिती मिळताच चामोर्शी पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळ गाठले. बोट किंवा डोंगा उपलब्ध नव्हता. जिवाची पर्वा न करता त्यांनी स्वतःला रस्सीदोरखंड बांधून खोल पाण्यात उड्या मारल्या. साधारणतः एक तास शोधमोहीम केली. चारही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
स्थानिक युवकांनी पोलिसांना या कामी मदत केली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेश खांडवे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर साठे, पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील आणि इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कृषक हायस्कूल चामोर्शी येते शिकत होते. या चारही युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही. शिवाय पोहता येत नव्हते. त्यामुळे त्यांचा घात झाला. घटनेची माहिती झाली. तोपर्यंत या युवकांचे मृतदेहच सापडले. बचाव पथक आणि पोलीस यांनी या युवकांचे मृतदेह बाहेर काढला. त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्याचे काम सुरू आहे.