मराठवाड्यात अंदाजे 30 टक्के इंधन तुटवडा; इंधनाची खेप लगबगीनं पाठवा, इंधन टंचाईविरोधात या राज्याचे मुख्यमंत्री मैदानात
तर मंडळी मुद्दा आहे देशातल्या इंधन टंचाईचा. पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत नसल्याची ओरड गेल्या तीन दिवसांपासून देशभरातून होत आहे.मराठवाड्यात ही अंदाजे 30 टक्के इंधन तुटवडा असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडं सरकारी कंपन्यांनी ट्विट करुन देशात पेट्रोल-डिझेलचा तुटवडा नसल्याचा दावा केला आहे.
देशभरात गेल्या तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेल टंचाईची (Shortage of Petrol-Diesel) जोरदार ओरड होत आहे. पेट्रोल-डिझेल पंपांवर इंधन पुरवठा पुर्ण क्षमतेने करण्यात येत नसल्याचा दावा करण्यात येत आहे. मराठवाड्यातही पेट्रोल-डिझेलचे शॉर्टेज सुरु असल्याचा दावा औरंगाबाद पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे सचिव अखिल अब्बास (Akhil Abbas) यांनी केला आहे.मराठवाड्यात अंदाजे 30 टक्के इंधन तुटवडा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. टीव्ही 9 शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान अनेक राज्यात पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या वादात आता छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल (CM Bhupesh Baghel) यांनी ही उडी घेतली आहे. राज्यात इंधनाचा तुटवडा असून तातडीने केंद्राने इंधन पुरवठा करावा यासाठी त्यांनी केंद्राला साकडे घातले आहे. त्यांनी पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी (Petroleum Minister Hardeep Puri) यांना याविषयीचे पत्र पाठविले आहे.
देशात 79 हजार पेट्रोल पंप
सरकारने देशात अनेक भागात इंधन पुरवठा होत नसल्याची गोष्ट मान्य केली असली तरी देशात पर्याप्त इंधन असल्याचा दावा केला आहे. सरकारच्या दाव्यावर विश्वास ठेवल्यास देशात पर्याप्त इंधन असले तरी त्याचा पुरवठा वेळेत आणि प्रमाणात करण्यात येत नसल्याची गोष्टी स्पष्ट होते. पेट्रोलियम प्लॅनिंग आणि अॅनलिसस सेलच्या अहवालानुसार, देशात डिसेंबर 2021 मध्ये 79417 इंधन पुरवठा करणारे पंप आहेत. याठिकाणाहून ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यात येतो. एकदाच इंधन उचलणारे मोठे डिलर्स या रिटेल पंपापर्यंत वेळेत पुरवठा करत नसल्याने इधन तुटवडा येत असल्याचा दावा सरकार करत आहे. ट्विट करुन सरकारने देशात इंधनाचा तुटवडा नसल्याचा दावा केला आहे.
PIB Delhi~”Production of Petrol and Diesel in the country is more than sufficient to take care of any demand surge. Sufficient supplies of Petrol & Diesel are being made available to cater to extra demand”.@PIB_Indiahttps://t.co/PzpYJ4cYME@HardeepSPuri @IndianOilcl @BPCLimited pic.twitter.com/1glGam2LKG
— Hindustan Petroleum Corporation Limited (@HPCL) June 15, 2022
कंपन्यांना नुकसान
पीटीआयच्या वृत्तानुसार, इंडियन ऑईल, एचपीसीएल आणि बीपीसीएल गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या दराने कच्चे तेल विकत घेत आहे, परंतू देशातील पेट्रोल-डिझेलचे भाव गेल्या 30 दिवसांपासून जैसे थे आहे. त्यामुळे कंपन्यांना पेट्रोल मागे प्रति लिटर 14.18 रुपये तर डिझेल मागे प्रति लिटर 20-25 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.
शेतकरी आणि आवश्यक सेवांना फटका
इंधन तुटवड्याचा सर्वाधिक फटका बसला असेल तर तो शेतक-यांना आणि अत्यावश्यक सेवा बजावणा-या संस्थांना. इंधन तुटवड्यामुळे त्यांना वेळेत कामे पुर्ण करता येत नसल्याचे चित्र आहे. मान्सून हवा तसा सक्रीय झालेला नाही. तो सक्रीय झाल्यास शेतीच्या कामांना वेग येणार आहे. अशावेळी इंधनाअभावी अनेक सेवा पुरवठादारांना वेळेत काम करता येणार नसल्याचे म्हणणे मुखमंत्री बघेल यांनी केंद्राला लिहिलेल्या चिठ्ठीत मांडले आहे.