महिलांच्या हाफ तिकीटने एसटीला फूल्ल प्रॉफीट ! एका दिवसात इतक्या कोटींचा जमवला गल्ला
एसटी महामंडळाने महीलांना अर्धे तिकीट आकारण्याची घोषणा केल्यानंतर त्याविरोधात आणि बाजूने अशा दोन्ही बाजूंनी चर्चा होत आहे. आता या निर्णयाचा एसटी महामंडळावर नेमका काय परिणाम झाला आहे ते पाहूया
मुंबई : एसटी महामंडळाने महिलांसाठी अर्धे तिकीट आकारणी करणारी महिला सन्मान योजना जाहीर केली आहे. शुक्रवार दिनांक 17 रोजी ही योजना लागू झाली आणि एका दिवसात 5 कोटी 68 लाखाचा गल्ला एसटीने जमवला आहे. राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी तिकीटांची अर्धी रक्कम भरून प्रवास करता येणारी ‘महिला सन्मान योजना’ लागू केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या योजनेची घोषणा केली होती.
महीलांना एसटीच्या प्रवासात अर्धे तिकीट आकारण्याच्या ‘महिला सन्मान योजनेचा ‘जीआर’ लागलीच न काढल्याने गोंधळ उडाला होता. कंडक्टर आणि महिला प्रवाशांमध्ये वाद होऊन कंडक्टरला मारहाण झाली होती. तसेच कर्नाटक सीमेवर कर्नाटकी महिलांना योजना लागू करण्यावरूनही हमरीतुमरी झाल्यावर एसटीला पुन्हा नव्याने स्पष्टीकरण करावे लागले होते.
या योजनेद्वारे महिलांसाठी अर्धे तिकीट आकारल्याने प्रवासी वाढले आहेत. त्यामुळे एसटीने एका दिवसातच राज्यभरात 5 कोटी 68 लाखांची कमाई केली आहे. 18 मार्च रोजी राज्यभरात 11 लाख 30 हजार 283 महिलांनी महिला सन्मान योजनेच्या माध्यमातून 50 टक्के तिकीट दरात सवलतीचा प्रवास केला. यातून एसटी महामंडळाला एका दिवसाचे 2 कोटी 84 लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. एवढीच रक्कम शासन या योजनेची प्रतिपुर्ती रक्कम म्हणून महामंडळाला देणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला ही योजना फळदायी ठरणार आहे.
एसटीने ‘महिला सन्मान योजना’ काढल्याने अनेकांना असे वाटते की महामंडळाला तोटा सहन करावा लागेल. परंतू तिकीटांची अर्धी रक्कम सरकार एसटीला प्रतिपूर्ती म्हणून अन्य 29 समाज घटकांच्या सवलती प्रमाणे याची परतफेड सरकार एसटीला करणार आहे. या योजनेमुळे एसटीला तोटा होण्याऐवजी उलट झालीच तर प्रवासी संख्येत भरच पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई विभागाचेही उत्पन्न चौपटीने वाढले
डेपो – प्रवासी आधी – एक दिवसांनंतर – उत्पन्न आधी – एक दिवसांनंतर
मुंबई – 233 – 1,153 – 23,798 – 1,19206
परळ – 221 – 945 – 11,329 – 62,857
कुर्ला – 256 – 1,388 – 4,354 – 55,578
पनवेल – 2,634 – 4,695 – 48,459 – 88,637
उरण – 1,209 – 4,701 – 17,046 – 81,374
मुंबई डीव्हीजन – 4,553 – 1,2882 – 1,04,986 – 4,07,652