Sindhutai Sapkal Death | दुपारी 12 वाजता सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार, पुण्यात 2 तास अंत्यदर्शन
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थित दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
पुणे : ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 75 व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्या जाण्याने पूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडला असून त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव दोन तासांसाठी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सपकाळ यांच्या पार्थिवावर दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल येथे महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार दफणविधी केला जाईल.
बाल सदन संस्थेत पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार
अनाथांचा आधार तसेच हजारो लेकरांची माय अशी सिंधुताई सपकाळ यांची ओळख आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अनाथ मुलांना वाढवलं. त्यांना आईची माया दिली. मात्र त्यांचे निधन झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. आज सिंधुताई सपकाळ यांच्यावर अंत्यसंस्कार केला जाणार आहे. त्याआधी त्यांचे पार्थिव सकाळी 9 वाजता नोबल हॉस्पिटलमधून मांजरी येथे नेले जाणार आहे. त्यानंतर सकाळी 9 ते 11 पर्यंत मांजरीच्या बाल सदन संस्थेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.
दुपारी 12 वाजून 10 मिनीटांनी अंत्यसंस्कार
अंत्यदर्शनाची वेळ संपल्यानंतर दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी नवी पेठेतील ठोसर पागेल या भागात त्यांच्यावर महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या पार्थिवावर दफनविधी केला जाईल.
सिंधुताईंच्या जाण्याने महाराष्ट्र हळहळला
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. आईच्या ममतेनं हजारो अनाथांचा सांभाळ करणारी ती मातृदेवताच होती. त्यांच्या अचानक जाण्यानं समाजसेवेतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून हरपले आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनामुळे समाजातील अनाथांच्या डोक्यावर मायेचे मातृछत्र धरणारी माय हरपली आहे. समाजातील हजारो अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करुन त्यांच्यावर मायेची पखरण करणाऱ्या सिंधुताईंच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुताईंना श्रद्धांजली वाहिली आहे.
इतर बातम्या :
Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्यासह भावावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा, फसवणूक केल्याचाही आरोप
Maharashtra News And Omicron Live Update : नरखेड तालुक्यात आरोग्य निरीक्षकाला मारहाण, गुन्हा दाखल