घरांमध्ये पाणी, जिल्ह्यातील 16 रस्ते बंद, गडचिरोलीत पावसाचा हाहाःकार
आरमोरी, कुरखेडा, चार्मोशी, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, देसाईगंज या तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस थांबण्याचं नाव घ्यायला तयार नाही.
गडचिरोली : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेला आदिवासी जिल्हा गडचिरोलीत (Gadchiroli flood) पुराने हाहाःकार माजवलाय. अनेक गावं गेल्या काही दिवसांपासून संपर्काच्या बाहेर आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ते आणि पूलही वाहून (Gadchiroli flood) गेले आहेत. आरमोरी, कुरखेडा, चार्मोशी, अहेरी, भामरागड, सिरोंचा, एटापल्ली, मुलचेरा, देसाईगंज या तालुक्यात तीन दिवसांपासून पाऊस थांबण्याचं नाव घ्यायला तयार नाही.
देसाईगंज तालुक्यात तीन तासात 215.5 मिमी पडल्याने विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. भामरागड तालुक्यातील 100 पेक्षा अधिक गावांचा तीन दिवसापासून संपर्क तुटलेला आहे. या पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. काही भागात 8 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
जिल्ह्यातील आठ नद्यांना महापूर
भामरागड तालुक्यातील पर्लाकोटा आणि बंढीया पुलावरून पाणी वाहत असलयाने आलापल्ली – भामरागड मार्ग तीन दिवसापासून बंद आहे. वाहतूक पूर्णपणे ठप्प असून भामरागड गावात पुराचं पाणी शिरल्याने 25 घरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. पर्लकोटा, वैनगंगा, दिना, प्राणहिता, इंद्रवती, गोदावरी, इराई, साप या आठ नदयांना मोठया प्रमाणात पूर आलेला आहे.
या पुरात जीवितहानीही होत आहे. आतापर्यंत दोन जण वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. रामदास मादगू उसेंडी हे आरमोरी तालुक्यातील मेंढा येथील नाल्याच्या पुरात वाहून गेले. तर चामोर्शी तालुक्यातील पाविलसनपेठा येथील सुधाकर पोटावी हे पोरनदीत वाहून गेल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव गावानजवळ शेतामध्ये कामसाठी गेलेल्या 25 युवकांना नाला आणि खोबरगाडी नदीच्या पुराचे पाण्याने वेढा घातला. त्यांना ताबडतोब मदत करून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. याच तालुक्यातील चामोर्शीमाल येथील चामोर्शीमाल ते वैरागड रोडला असलेल्या नाल्याला आलेल्या पुरामुळे शेतरानात अडकून पडलेल्या 15 लोकांना रेस्क्यू बोटीच्या साहाय्याने सुखरुप सुटका करण्यात महसूल आणि पोलीस विभागाला यश आलं.
जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग
- कुरखेडा-वैरागड-रंगी
- अहेरी – गडहेरी
- अल्लापल्ली-भामरागड / पार्लकोटा, बांदिया, चंद्र, कुमारगुंडा, पर्मिली नाला
- कमलापूर-रेपनपल्ली
- आर्मोरी-वडसा
- शकरपूर- बोदधा
- फरी- किन्हाळा गढवी
- एटापल्ली – आलापल्ली
- अल्लापल्ली-सिरोंचा
- बमरागा-लाहेरी
- छटगाव-पेंढारी-करवाफा
- मानापूर- पायसेवाधा
- हळदी- डोंगरगाव
- कोरची- घोटेकसा
- धानोरा – मालेवाडा -इरोपधोदरी
- चोप- कोरेगाव