मराठवाड्याच्या मातीतलं कसदार सोनं, 26 नक्षल्यांचा खात्मा करणाऱ्या IPS सोमय मुंडेच्या यश अपयशाचा ‘कुटाणा’
सोमय विनायक मुंडे हे नांदेडच्या देगलूरमधील आहेत. मुंडे यांनी आयआयटीमधून एमटेक केलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण देगलूरमधीलच साधना हायस्कुलमध्ये झालं. पुढील शिक्षण त्यांनी सातारा सैनिक स्कुलमधून आणि राष्ट्रीय मिलटरी कॉलेज, देहरादूरमधून केलं. सोमय यांनी एमटेकची पदवी आयआयटी मुंबईतून घेतली आहे.
मुंबई : गडचिरोली पोलिसांनी केलेल्या कारवाईत देशभरातील नक्षलवादाला मोठा हादरा बसला आहे. गडचिरोली पोलिसांनी 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलंय. या कारवाईमुळे महाराष्ट्र पोलिसांची मान उंचावली गेलीय. ही कारवाई गडचिरोलीतल्या आहेरीमधील अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलीय. या कारवाईमुळे सोमय मुंडे आणि त्यांच्या टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशावेळी सोमय मुंडे यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास कसा राहिला? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. हा प्रवास सोमय मुंडे यांनीच एका खासगी कार्यक्रमात सांगितला होता. (IPS Somay Munde’s journey to becoming an IPS officer)
सोमय विनायक मुंडे हे नांदेडच्या देगलूरमधील आहेत. मुंडे यांनी आयआयटीमधून एमटेक केलं आहे. त्यांचं प्राथमिक शिक्षण देगलूरमधीलच साधना हायस्कुलमध्ये झालं. पुढील शिक्षण त्यांनी सातारा सैनिक स्कुलमधून आणि राष्ट्रीय मिलटरी कॉलेज, देहरादूरमधून केलं. सोमय यांनी एमटेकची पदवी आयआयटी मुंबईतून घेतली आहे. त्यानंतर त्यांनी मार्ग बदलला आणि ते यूपीएससीकडे वळाले. 2016 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात यांना यश मिळालं.
सोमय मुंडे यांचा आयपीएस बनण्यापर्यंत प्रवास त्यांच्याच तोंडून…
चार वर्षापूर्वी मी आयआयटीतून पदवीधर झालो होतो. एका आयआयटीयनला वाटतं की जग पूर्ण त्याच्या पायथ्याशी आहे. त्याला भरपूर पगार असते, एखाद्या एमएनसीची ऑफर असते. तसंच मला होतं. मला चांगली ऑफर होती. वाटत होतं की आपली गाडी रुळावर आहे, म्हणजे आपण जसं ठरवलं होतं तशी जात आहे. जे मी ठरवलं होतं तसंच होत होतं. जसं प्लॅन केलं तसंच करिअर चालत होतं. पण मनाला काही शांती नव्हती. मन तरीपण चलबिचल होतं. मन चलबिचल असण्याचं कारण शोधायला सुरुवात केली तेव्हा मला माहिती होतं की त्याचं कारण काय आहे. मी माझ्या सिनियर्सची वाटचाल बघत होतो. ते कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करत होते, एक-दोन वर्ष जॉब केला होता त्यांनी. ते पाहून वाटत होतं की बाबा अशी लाईफ मला नकोय. ते 9 वाजता ऑफिससाठी निघतात. मुंबईची ट्राफिक, नेव्हिगेट करुन ते कसेतरी आपल्या फोर बाय फोरच्या क्युबिकलमध्ये पोहोचतात. 9 ते 5 ते आपल्या कम्प्यूटरसमोर काम करतात. त्यांचं जीवनात ध्येय असतं की बाबा अजून चांगल्या पगाराची नोकरी कशी मिळवायची, कसं अजून चांगलं प्रमोशन घ्यायचं. मला हे ध्येय नको होतं, मला अजून पुढे जाऊन काहीतरी करायचं होतं.
Gadchiroli SP says there must be around 100 Naxals at the encounter spot yesterday of which 26 are killed and the remaining have fled from the spot. Total 300 commandos of the C-60 Unit were involved in the action,the team was lead by Add SP Somay Munde who deserves the credit.
— Ali shaikh (@alishaikh3310) November 14, 2021
‘दूर कुठेतरी एक यूपीएससीचं, आयपीएसचं एक शिखर दिसत होतं’
2008 मध्ये मी कॉलेजला होतो. फर्स्ट ईअरला होतो. मुंबईमध्ये अतिरेकी हल्ला झाला होता 26/11 चा, मुंबईत होतो मी. पूर्ण मुंबईला या 10 अतिरेक्यांनी वेठीस धरलं होतं. पूर्ण भारत टीव्हीसमोर बसून हे सगळं चित्र पाहत होता, आमच्या कॉलेजमध्ये कुणाला काही फरक पडला नाही. कुणाला काही वाटलं नाही की बाबा काय चालू आले. त्यावेळी मला वाटलं की आपण आपल्या समाजापासून इतके कसे कटऑफ होऊ शकतो. आपल्या समाजात येवढे प्रॉब्लेम्स आहेत, बेरोजगारी, गरीबी, जे पण तुम्ही म्हणा… अतिरेकी हल्ले होतात. या सगळ्यासोबत फाईट करण्याची इच्छा होती. ती एक तीव्र मनामध्ये होती. सैनिक स्कुल आणि मिलटरी स्कुलमध्ये अभ्यास केल्यामुळे युनिफॉर्मची आवड एक लहानपासूनच मनात होती. पण प्रॉब्लेम हा होता की मी एका कॉर्पोरेट जगाचं शिखर चढत होतो आणि मला माहिती होतं की बाबा हे शिखर कसं चढायचं आहे. मला माहिती होती की यात अडथळे कुठे आहेत, खड्डे कुठे आहेत आणि कसं आपण चालत चालत वर-वर हळूहळू पोहोचायचं. पण दूर कुठेतरी एक यूपीएससीचं, आयपीएसचं एक शिखर दिसत होतं. असं ढगापेक्षा उचं काही शिखर असतात ना तसं एक शिखर होतं ते. माहिती नव्हतं की बाबा आपण हे शिखर चढू शकतो की नाही. या दोन शिखराच्या मध्ये एक मोठी दरी होती. ती अपयशाची दरी होती म्हणा. असे अनेक अनुभव आम्ही ऐकले होते आमच्या सिनियर्सकडून की बाबा किती खोल ही दरी आहे आणि या दरीत पडल्यावर काय काय होऊ शकतं. तरी पण म्हणतात ना की ये दिल है की मानता नही… तशीच एक इच्छा होती. तरुण मन जे असतं ते हृदयाचं ऐकत असतं, स्वत:च्या बुद्धीचं जास्त ऐकत नाही. त्यामुळे बजरंग बली की जय म्हणून मारली उडी. (IPS Somay Munde’s journey to becoming an IPS officer)
‘तुमच्या यशानं वा अपयशानं जगाला जास्त फरक पडत नाही’
लागलो अभ्यासाला… आई-वडिलांना सांगितलं की यूपीएससीची तयारी करायची आहे. ते पण थोडे थक्क झाले होते की बाबा आतापर्यंत काही बोलला नाही आणि आता काय याच्या डोक्यात शिरलं एकदम. भरपूर अभ्यास केला, रात्रंदिवस एक केला. प्रिलिम क्लिअर केली. मेन्सची परीक्षा दिली, मेन्सपण क्लिअर केली. मुलाखतीसाठी कॉल आला आणि असं वाटलं की बाबा आपलं लक्ष्य जे आहे ते एकदम जवळ आहे, एकदम आपल्या हातात आलं आहे. कसं आहे की, ज्यावेळी तुम्हाला मुलाखतीसाठी फोन येतो तेव्हा तुमच्या आजूबाजूच्या लोकांचं वागणं ते थोडं बदलून जातं. त्यांना वाटतं की बाबा हा मुलगा आता मोठा अधिकारी बनणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला थोडा आदर देण्यास सुरुवात करतात. तुम्हालाही वाटतं की बाबा झालंच माझं. मुलाखत झाली की माझा तो कठीण प्रवास आहे तो संपला. ज्या क्षणाची मी वाट पाहत होतो, निकाला दिवस आला. कुणीतरी सांगितलं की यूपीएससीचा निकाल आलाय. फटाफट मी कम्प्यूटर ऑन केला. पीडीएफ डाऊनलोड केलं. माझं नाव तपासलं. मुंडे म्हणून सर्च केलं तर टंग करुन आवाज आला, म्हणजे निकाल आला. खूश झालो मी एकदाम. नाव वाचलं मी पूर्ण, पण तो काय सोमय मुंडे नव्हता. तो दुसराच कुणीतरी मुंडे होता. एकदम खूश झालेलो मी एकदम खचून गेलो. असं वाटलं की बाबा हे काय झालं आपल्यासोबत. जस्ट आता क्लिअर करणार होतो आपण आणि असं कसं झालं. भरपूर फोन येत होते लोकांचे. फोन आला आई-वडिलांचा, फक्त त्यांना सांगितलं की नाही झालं माझं. फोन बंद केला आणि बसलो असंच. काय करावं सुचत नव्हतं. डोळ्यातून अश्रू आले, भरपूर दिवस रडलोही. एक दिवस मग असेच अश्रू थांबले. तुम्ही ही गोष्ट चांगली समजून घेतली पाहिजे की तुमच्या यशानं वा अपयशानं जगाला जास्त फरक पडत नाही. फक्त तुम्हाला फरक पडतो आणि तुमच्या क्वचित तुमच्या आजुबाजूच्या जवळच्या लोकांना त्याचा फरक पडतो. त्यामुळे तुम्ही केवळ एक माणूस नाहीत जे यशस्वी वा अयशस्वी झालात. त्यामुळे स्वत:च्या यशाचं वा अपयशाचा जास्त कुटाणा किंवा भांडवल करुन ठेवायचं नाही. यश भेटलं, चांगलं आहे पुढे निघा. नाही भेटलं तर कामाला लागा.
‘दुसऱ्या वर्षीच्या निकालात नक्कीच सोमय मुंडेचं नाव होतं’
असं म्हणतात की अपयश ही यशाही पहिली पायरी आहे. पण कुणी हे सांगत नाही की अशा किती पायऱ्या चढाव्या लागतील. असे किती जिने आपल्याला वर चढावे लागतील आणि नंतर मग तुम्हाला यश मिळेल. पुन्हा मेहनत केली, रात्रंदिवस एक केला. पुन्हा परीक्षा दिली. दुसऱ्या वर्षी ज्यावेळी निकाल तेव्हा तेव्हा नक्कीच त्यात सोमय मुंडेचं नाव होतं.
इतर बातम्या :
फुकट्यांकडून 100 कोटींची वसुली! रेल्वेचा मोठा महसुली तोटा वाचला
IPS Somay Munde’s journey to becoming an IPS officer