धाराशिव | 15 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी सभा होत आहेत. बीड जिल्ह्यात पारगाव येथे जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी महिलांनी जरांगे पाटील यांचे स्वागत आरती ओवाळून केले. त्यावेळी उपस्थित मराठा समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. बीड जिल्ह्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे सभा होत आहे. मात्र, वाशी येथील सभा सुरु होण्यापूर्वीच एक मोठा वाद निर्माण झाला आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी १०० किलो फुलांचा हार बनविण्यात आला आहे. मात्र, हा हार बनविणाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथे सकाळी 11 वाजता सभा होणार होती. मात्र, जरांगे पाटील यांचे गावोगावी जोरदार स्वागत करण्यात येत आहे. ठिकठिकाणी त्यांचे महिलांकडून औक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे पुढील नियोजित ठिकाणी पोहोचण्यास त्यांना वेळ लागत आहे. त्यामुळेच तब्बल 7 तास उशीर झाला तरी वाशी येथील सभेठिकाणी हजारो लोक जरांगे पाटील यांची वाट पहात उभे आहेत.
मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी वाशी शहरात मराठा समाजाचे हजारो कार्यकर्ते जमा झाले आहेत. जरांगे पाटील यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे. तसेच, तब्बल १०० किलो फुलांचा हार क्रेनच्या सहाय्याने घालण्यात येणार आहे. माळी समाजाच्या वतीने हा फुलांचा हार आणि जेसीबीमधुन फुलांची उधळण केली जाणार आहे. तर, महिला आरती करुन जरांगे पाटील यांचे स्वागत करणार आहेत.
माळी समाजाच्यावतीने घालण्यात येणारा हा 100 किलो फुलांचा हार माळी समाजातील कार्यकर्ता भगवान ओव्हाळ आणि दत्तात्रय तोडकर यांनी बनविला आहे. याच दोन कार्यकर्त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. नाशिक येथून काही पदाधिकारी धमकी देत असल्याचा आरोप भगवान ओव्हाळ आणि दत्तात्रय तोडकर यांनी केला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यावे आणि मंत्री भुजबळ यांच्या आरक्षणविरोधी भूमिकेला भगवान ओव्हाळ आणि दत्तात्रय तोडकर यांनी जाहीर विरोध केला होता. तर, जरांगे यांचे वाशी येथे पुष्पवृष्टी करून माळी समाजाच्यावतीने स्वागत करण्यात येणार आहे. त्यामुळेच आपणास धमकी देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी बीड येथील सभेत बोलताना एक डिसेंबरला गावागावात साखळी उपोषण करा असें आवाहन केलंय. आता बघू सरकार किती भारी पडते ते. सर्वजण मिळुन आता एकजुट करा. सरकारला आता नोंदी सापडत आहेत. आमच्या भोकरदन वाल्यांनी गाव प्रवेश बंदीचे बोर्ड काढले. त्यावर तुम्ही तुमच्या पोरांचे मुडदे पडावे म्हणून पोस्टर लावले का? असा टोला त्यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना लगावला.