संजय शिरसाट यांना मंत्रीपद द्या… शरद पवार गटाच्या आमदाराने डिवचले; कोण म्हणालं असं?
लोकसभा निवडणुकीतील निकालात मोठा पराभव पत्करावा लागल्यानंतर महायुतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पक्षातील आमदारांना थोपवून ठेवण्यासाठी आता विधानसभेच्या अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. त्यासाठी महायुतीत मोठी लॉबिंग सुरू झाली असून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मात्र महायुतीच्या इच्छुकांची टिंगलटवाळी करणं सुरू केलं आहे.
राज्यात अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. मागच्या विस्तारात फक्त अजितदादा गटाच्या लोकांना संधी देण्यात आली होती. भाजप आणि शिंदे गटातून कुणालाही शपथ देण्यात आली नव्हती. त्यामुळे आता होणाऱ्या विस्तारात अजितदादा, शिंदे गट आणि भाजपच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, किती लोकांना मंत्रीपदाची शपथ देणार हे गुलदस्त्यात आहे. असं असलं तरी तिन्ही पक्षातील आमदारांनी मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे नेते, आमदार रोहित पवार यांनी शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना जोरदार टोला लगावला आहे.
संजय शिरसाट यांची तर अडचण होऊन बसली आहे. मंत्रीपद मिळणार म्हणून त्यांनी कपडे शिवून ठेवले आहेत. त्यांना मागच्या 2 वर्षांपासून मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. निदान शेवटचे चार महिने तरी मंत्रिपद मिळेल, असं त्यांना वाटायला लागलं आहे. निदान शिरसाट यांना चार महिने तरी मंत्रिपद द्या, तसंही पुढचे सरकार हे मविआचे येणार आहे, असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
मला कोणत्या लेव्हलला नेऊन ठेवलंय
2019 मध्येच रोहित पवार हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते, असा गौप्यस्फोट काल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला होता. त्यावर त्यांनी तटकरे यांना चांगलंच फैलावर घेतलं. बरं झालं तटकरे साहेब म्हणाले नाही की मला अमेरिकेत जाऊन राष्ट्रपती पदाची निवडणूक लढायची होती. कधी हे मला बच्चा म्हणतात, कधी म्हणतात मंत्रीपद पाहिजे, मुख्यमंत्री पद पाहिजे, यांनी मला कोणत्या लेव्हलला नेऊन ठेवलंय तुम्हीच पाहा, असा टोला त्यांनी तटकरे यांना लगावला.
आधी ते सांगा
सोबतच तटकरे साहेबांनी भाजप सोबत त्यांची काय चर्चा झालीये ते आधी सांगावं. पक्षातील इतर नेते सोडून अजित पवारांना घरातच राज्यसभा का द्यावी लागली हेही त्यांनी सांगावं, असं आव्हानच त्यांनी दिलं.
सरकार दिशाभूल करतंय
सर्वच सामाजिक कार्यकर्ते प्रमाणिकपणे राज्यातील युवकांच्या हितासाठी आरक्षणाचा लढा देत आहेत. मात्र आरक्षण मुद्दा हा राज्याच्या पातळीवर सुटणारा नसून केंद्रातून हा प्रश्न सुटणार आहे. त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर हे सरकार लोकांची दिशाभूल करत आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.