Devendra Fadnavis : सदावर्ते फडणवीस यांचे पिल्लू? ते उदाहरण देत फडणवीस म्हणाले, ‘असे आरोप केले असतील तर…’
मी जातीचं कार्ड कधीच प्ले करत नाही. सामान्य माणसाच्या मनात जात नसते. कर्तुत्व असंत. त्यांना काही काळासाठी भ्रमित करू शकता. काही काळासाठी मला टार्गेट करू शकता. पण, सदा सर्वदा करू शकत नाही. शेवटी तुम्ही काय केलं हा प्रश्नच येत नाही.
मुंबई : | 28 ऑक्टोबर 2023 : मराठा समाजचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तर गुणरत्न सदावर्ते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पिल्लू असल्याचा आरोप केला. तर, मंगेश साबळे आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला केला. यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा चर्चेत आले. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे आरोप साफ फेटाळून लावले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला झाला. कुठल्याही हिंसेचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. गाड्या फोडणं चुकीचं आहे. ज्या कुणी हे केलं त्यावर कारवाई झाली आहे. पण, सदावर्तें यांनीही लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्या समाजाविरुद्ध आपण किती बोलावं आणि का बोलावं? लोकांच्या भावना भडकल्या तर त्यावर रिअॅक्शन येते. संविधानाचे एक्सपर्ट आहेत तर त्यांनी असं विधान करणं योग्य आहे का. कोणत्या समाजाच्या भावना भडकावणं योग्य आहे का, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
सदावर्ते फडणवीसांचा माणूस?
शरद पवार यांची जी वाचलेली राष्ट्रवादी आहे ती हा नरेटीव्ह तयार करत आहे. २७ जून २०१९ ला मराठा आरक्षण दिलं. ते वैध ठरवल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिला. त्यावेळी सदावर्तेंची मुलाखत झाली. त्यामध्ये सदावर्ते म्हणतात, फडणवीस यांच्यापासून आणि तेव्हाचे ज्वॉइंट सीपीपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझं बरं वाईट झालं तर त्याला फडणवीस जबाबदार असतील. त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो. जर त्यांनी असे आरोप केले असतील तर ते माझे कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
गुणरत्न सदावर्ते मुलाखतीत म्हणतात, मराठा आरक्षणासाठी फडणवीस यांनी कोर्टावर दबाव टाकला. दबाव टाकून मिळवलेलं आरक्षण आहे. अनेक वेळा माझ्यावर सदावर्तें यांनी अनेक आरोप केले माझा एकेरी उल्लेख केला. संघाविरोधात बोलले. ज्या व्यक्तीच्या मी स्वतः त्यांच्याविरोधात जाऊन सर्व पिटीशनरच्या विरोधात जाऊन हायकोर्टात केस जिंकली. ते माझे कसे झाले? असेही फडणवीस म्हणाले.
सदावर्तें यांना फक्त मी दोनदा भेटलो. त्यातील एकदा सार्वजनिक कार्यक्रमात भेटलो. हा नरेटिव्ह चालवण्याचा प्रयत्न जे लोकं आरक्षण देऊ शकले नाहीत ते करत आहेत. मी आरक्षण दिलं होतं आणि हायकोर्टात टिकलं होतं. एकच आरक्षण हायकोर्टात टिकलं ते मराठा. मी मुख्यमंत्री असताना सहा महिने कोर्टात होतं. मी मुख्यमंत्री असताना स्थगिती दिली नाही. त्यानंतर काय घडलं माहित आहे. वकिलांना ट्रान्सलेशन मिळत नव्हतं. माणसं मिळत नव्हती. भरती थांबवली. एखाद्याला क्रेडिट दिलं जात नाही तेव्हा डिस्क्रेडिट केलं जातं. असंच कोणी तरी जरांगेंना सांगितलेलं दिसतं. सदावर्तें यांच्यासीन माझा काहीच संबंध नाही. ते जे काही बोलतात त्याला माझं समर्थन नाही असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मी जातीचं कार्ड कधीच प्ले करत नाही. सामान्य माणसाच्या मनात जात नसते. कर्तुत्व असंत. त्यांना काही काळासाठी भ्रमित करू शकता. काही काळासाठी मला टार्गेट करू शकता. पण, सदा सर्वदा करू शकत नाही. शेवटी तुम्ही काय केलं हा प्रश्नच येत नाही. सदावर्ते यांनी मी न्यायालयाला फोन केले. माझ्या जीवाला फडणवीस यांच्यापासून धोका असल्याचं म्हणाले. मात्र, ते कुणाचे आहेत हे मलाही माहीत नाही. त्यांचा कोण वापर करतंय की ते मनाने बोलतात हे माहीत नाही. पण, माझा आणि त्यांचा कोणताही संबंध नाही, असे फडणवीस यांनी सांगत या चर्चाना पूर्णविराम दिला.