HISTORY : असा वीर मराठा योद्धा! स्वराज्याचा पहिला रणसंग्राम गाजवला, संभाजी महाराजांच्या हत्येचा घेतला बदला
कऱ्हा नदीकाठी असलेल्या संगमेश्वर मंदिराजवळील पुलावरून पुढे गेल्यास एक समाधी आहे. ही समाधी आहे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा कार्यकाळ अनुभवणारे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेणारे एका महायोद्धा सरदारांची... कोण होते ते सरदार? काय आहे त्यांचा इतिहास?
मुंबई : महाराष्ट्रातील पुणे – बारामती या मार्गावर सासवड नावाचे एक छोटे शहर आहे. शहर छोटे असले तरी या शहराचा इतिहास मात्र मोठा दैदिप्यमान आहे. या शहराला हे नाव कसे पडले याच्या काही कथा आहेत. फार प्राचीन काळी ब्रह्मदेवाने येथे तप केले होते. त्यामुळे या भूमीला ब्रह्मपुरी असे म्हणत होते. तर, संत ज्ञानेश्वर यांच्या काळात येथे फक्त सहा वाड्या वस्त्या होत्या. त्यामुळे कालौघात सहा वाड्यांचे सासवड असे नाव पडले असावे असा एक तर्क मांडला जातो. याच सासवडमध्ये कऱ्हा नदी वाहते. सासवड ही संतभूमी असली तरी पराक्रमी योध्यांचीही ही भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया घातलेली ही तीच भूमी. छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला पुरंदर किल्लाही याच भूमीतला, स्वराज्यासाठी पहिली आहुती देणारे वीर बाजी पासलकर यांनी याच भूमीत आपला देह ठेवला. स्वराज्याचे निष्ठावंत सेवक पिलाजीराव जाधवराव, पानिपत संग्रमातून पार्वतीबाईंना सुखरूप आणणारा भिवडीचा जानू भिंताडा अशा कितीतरी योद्ध्यांच्या पराक्रमामुळे पावन झालेले सासवड… याच सासवडमधील कऱ्हा नदीकाठी संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूला एक पूल आहे. त्या पुलावरून थोडे पुढे गेले की डाव्या हाताला एक समाधी आहे. ही समाधी आहे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम गाजवणारे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांचा कार्यकाळ अनुभवणारे, छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा बदला घेणारे महायोद्धा सरदार गोदाजी जगताप यांची…
शिवशाहीच्या इतिहासाचा उषःकाल
शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे यांना जहागिर स्वरुपात सासवड हे गाव मिळाले होते. एक महत्त्वाचे लष्करी ठिकाण म्हणून त्याकाळी सासवड प्रसिद्ध होते. कारण, सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या साबगर, पांगार, पानवडी या खिंडी, बोपदेव, पुरंदर, भुलेश्वर, दिवे, शिंदवणे हे घाट ओलांडल्याशिवाय सासवड गाठणे कठीण. पुणे हे त्यावेळचे महत्वाचे ठिकाण आणि सासवड म्हणजे पुण्याचा छावा. पुण्यावर हल्ला करण्यासाठी किंवा त्याचे रक्षण करण्यासाठी सासवडचा उपयोग सर्वचजण करत असत. शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला आरंभ केला आणि शिवशाहीचा उषःकाल येथपासूनच सुरु झाला.
सरदार गोदाजी जगताप यांचे पूर्वज
दिल्लीच्या राजकारणात पृथ्वीराज चौहान हे एक महत्वाचे नाव होते. अखंड भारतात राजस्थान, मध्यप्रदेश या प्रदेशात रजपूत राजांचे वर्चस्व होते. या राज्यांवर परकीय आक्रमणे झाली आणि त्यांची राज्ये खालसा झाली. पुढे, दिल्लीचे राज्यही सुलतान शाहीने काबीज केले. भारतखंडात परकीय जुलूम सुरु झाला. मात्र, अशातही काही कडवट रजपूत त्यांच्याविरोधात निष्ठेने लढत होते. भरतपुर देशाचा राजा वसुसैन याच्या वंशात दोन पराक्रमी बंधू निपजले होते. त्यांनी भरतपुरवर जुलूम करणाऱ्या सुलतानी अधिकाऱ्याला ठार मारले. त्याला ठार केल्यानंतर ते महाराष्ट्रात आले. हे दोघे बंधू सासवड आणि बारामती जवळ असलेल्या पंदारे भागात स्थिरावले. सासवड भागात जो भाऊ स्थिरावला त्यांच्या घराण्यासोबत गोदाजी जगताप यांचा संबंध आहे असे सांगितले जाते.
कोण होते महायोद्धा सरदार गोदाजी जगताप?
गोदाजी जगताप यांचे वडील बहिर्जी हे 10 गावांचे देशमुख होते. सासवड, दिवे, कोढीत बुद्रुक, खळद, बेलसर, राख, मोढवे, बाबुर्डी, कारखेळ, कोळोली या गावांची देशमुखी जगताप घराण्याकडे होती. दिवे घाटातून पंढरीला जाणाऱ्या विठुरायाच्या वारीच्या संरक्षणाची जबाबदारी देखील देशमुखी असलेल्या जगताप घराण्याकडे होती. छत्रपती शिवाजी यांनी स्वराज्य स्थापनेला सुरूवात केली होती. विजापूर बादशाहच्या अमलाखालील तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे महत्वाचे किल्ले शिवाजी महाराज यांनी काबीज केले. त्यामुळे चिडलेल्या अदिलशाहने आपला सरदार फत्तेखान याला 20 हजारांची फौज देऊन शिवाजी महाराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी पाठविले.
स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला
फत्तेखान याने सुभानमंगल गड जिंकला. येथून जवळच असलेल्या पुरंदरवर त्याने हल्ला केला. यावेळी जेजूरीजवळ असलेल्या बेलसर येथे फत्तेखानाचा तळ होता. शिवाजी महाराज यांनी सुभानमंगलची कामगिरी कावजी मल्हार याच्यावर सोपविली होती. कावजी मल्हार यांनी एका रात्रीत आपली कामगिरी फत्ते केली. तर, फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, आणि गोदाजी जगताप या सरदारांना पाठवले.
महाराजांच्या या सरदारांनी खानाच्या फौजेवर अचानक हल्ला केला आणि पुरंदर किल्ला गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखान याने मराठा सरदारांचा पाठलाग केला. त्याने पुरंदर गाठले. खानाच्या सैन्याचा पुरंदरला वेढा पडला. मराठा सरदार पुन्हा मागे फिरले. गडाच्या पायथ्याशी मोठे युध्द झाले. सरदार बाजी पासलकर यांना या युद्धात वीरमरण आले. पण, यामुळे मराठे अधिकच चवताळले. गोदाजी जगताप आणि मुसेखान यांच्यात तुंबळ लढाई झाली. या लढाईत मुसेखानाच्या छातीवर गोदाजी यांनी तलवारीचा जोरदार वार केला. या वारामुळे मुसेखानाचा मृत्यू झाला. गोदाजीचा हा भीमपराक्रम पाहून फत्तेखानाने विजापूरला धूम ठोकली. गोदाजी जगताप यांच्या याच पराक्रमामुळे स्वराज्याचा पहिला रणसंग्राम मराठ्यांनी जिंकला.
10 नोव्हेंबर 1659 हा दिवस इतिहासातील सर्वात मोठा दिवस मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अजफलखानाचा वध केला. त्याच्या सैन्याचा मावळ्यांनी पराभव केला. या लढाईतही गोदाजी यांनी अफझलखानाचे असंख्य सैन्य कापून काढले. त्यानंतर विजापूर सरदार रुस्तुमेखान याने स्वराज्यावर चाल केली. दहा हजाराची फौज घेऊन आलेल्या रुस्तुमेखान याच्यासोबत झालेल्या लढाईतही गोदाजी यांनीदेखील पराक्रम करून खानाला पराभूत केले.
छत्रपती संभाजी महाराज यांना पकडले
1671 मध्ये मोंगलांनी साल्हेर किल्ल्यावर आक्रमण केले. साल्हेर किल्ला वाचवण्यासाठी गोदाजी जगताप पुढे सरसावले. या लढाईत त्यांच्यासोबत बंधू संताजी आणि खंडोजी होते. गोदाजी, संताजी आणि खंडोजी यांनी तिन्ही जगताप बंधूनी साल्हेर किल्ल्याच्या लढाईत पराक्रमाची शर्थ केली. 3 एप्रिल 1680 हा स्वराज्यासाठी काळा दिवस ठरला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाले. संपूर्ण स्वराज्यावर अवकळा पसरली होती. त्यांच्या पश्चात त्यांचे थोरले चिरंजीव संभाजी महाराज यांच्याविरोधात कट कारस्थाने सुरु झाली होती. मात्र, त्या कट कारस्थानांना पुरून उरत संभाजी महाराज यांनी मोगलांविरोधात लढा सुरूच ठेवला होता.
स्वराज्यामध्ये दुफळी माजली होती. याचा फायदा घेत औरंगजेब 50 हजार फौज घेऊन महाराष्ट्रात उतरला. पण, 1681 ते 1688 या काळात त्याला स्वराज्यातला एकही किल्ला जिंकता आला नाही. याचे कारण म्हणजे संभाजी महाराज यांचे युद्धकौशल्य. संतापाने पेटलेल्या औरंगजेब याने संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. संभाजी महाराज काही हाती लागत नव्हते. औरंगजेबाने संतापाने डोक्यावरचा किमोश काढून जमिनीवर आपटला. संभाजीला पकडल्याशिवाय किंवा ठार केल्याशिवाय हा किमोश डोक्यावर घालणार नाही, अशी शपथच त्याने घेतली होती. त्यानंतर 9 वर्ष तो भुंड्या डोक्याने महाराष्ट्रात फिरत होता.
संभाजीराजे यांच्याविरोधात असणाऱ्या काही मराठा सरदार यांनी कट कारस्थान रचले. यातील प्रल्हाद निराजी, मानाजी मोरे, गणोजी शिर्के, येसाजी आणि सिदोजी फर्जंद यांना संभाजीराजांनी पकडले. यातील प्रल्हाद निराजी आणि मानाजी मोरे यांना त्यांनी तुरुंगात टाकले. तर येसाजी आणि सिदोजी यांचा कडेलोट केला. पण, गणोजी शिर्के हा रत्नागिरी जवळील संगमेश्वरकडे पळून गेला. गणोजी शिर्के हा संभाजीराजे यांच्या पत्नी येसूबाई यांचा भाऊ. पण त्यानेच घात केला.
संगमेश्वरकडे पळून गेलेल्या गणोजी शिर्के याचा संभाजीराजे यांनी पाठलाग केला. गणोजी तेथूनही पळून गेला. त्यामुळे संभाजीराजे संगमेश्वर मुक्कामी राहिले. इकडे पळून गेलेल्या गणोजी शिर्के याने औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान यांच्याशी संधान साधले. मुकर्रबखान हा त्यावेळी कोल्हापूरला होता. संभाजीराजे यांना कैद करण्यासाठी तो कोल्हापूरवरून निघाला. गणोजी शिर्के याने मुकर्रबखानाला कोल्हापूरपासून संगमेश्वरला जाणारा राजापूरचा अनुस्करा घाट हा जवळचा रस्ता दाखविला. त्यामार्गे मुकर्रबखान संगमेश्वरला दाखल झाला. संभाजीराजे आणि मुकर्रबखान यांच्या फौजेत मोठी चकमक झाली. या लढाईत संभाजीराजे, कवी कलश यांच्यासह चोवीस मावळे जखमी झाले. तर, सेनापती माल्होजी घोरपडे धारातीर्थी पडले.
औरंगजेबाची रायगडावर चाल
संभाजीराजे यांना पकडण्यासाठी औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. नऊ वर्ष झाली तरी त्याला यश मिळाले नव्हते. मात्र, गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संभाजीराजे पकडले गेले. औरंगजेबाने संभाजीराजे यांना धर्मांतर करण्याची सक्ती केली. मात्र, ती त्यांनी धुडकावून लावली. त्यामुळे चिडलेल्या औरंगजेबाने तुळापुर येथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची हत्या केली. संभाजीराजे यांच्या हत्येमुळे मराठा मावळा पेटून उठला. तर, संभाजी महाराज यांच्या हत्येनंतर औरंगजेब याने आपले फासे रायगडाभोवती टाकण्यास सुरवात केली. सरदार जुल्किफार खान याने रायगडास वेढा घातला. त्यावेळी रायगडावर महाराणी येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई या राजघराण्यातील व्यक्ती आणि अन्य कारभारी मंडळी रायगडावर अडकले होते. औरंगजेबाने जुल्किफार खान याच्या मदतीला शहाबुद्धीन खानाला पाठविले.
7 हजार फौजेला 70 मावळ्यांनी जेरीस आणले
जुल्किफार खान याच्या मदतीला शहाबुद्धीन खान निघाला. शहाबुद्धीन खानाकडे 7 हजार इतकी मोठी फौज होती. ही खबर मराठ्यांच्या हेरखात्याला लागली. त्यांनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावात तळ ठोकून असलेल्या गोदाजी जगताप आणि जिवाजी नाईक या सरदारांना ही खबर पोहोचविली. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन गोदाजी यांनी सोबत असलेल्या फक्त 70 मावळ्यांसह शहाबुद्धीन खानाच्या सैन्यावर कावल्या बावल्याची खिंड (वीर खिंड) जवळ चढाई केली.
मावळ्यांनी खिंडीत मोक्याच्या जागा हेरल्या. त्यांच्या गोफणीमधून दगडांची बरसात शत्रू सैन्यावर होऊ लागली. समोर जो येईल त्याला कापत हे मराठे वीर पुढे पुढे सरकत होते. जमिनीवर रक्ताभिषेक होत होता. जखमी होत होते पण हार मानत नव्हते. त्यांचा हा आवेश पाहून शहाबुद्धीनचे सैन्य माघारी फिरले. शरीरावर असंख्य वार झाले होते. पण, त्यांनी खिंड मारली. त्यामुळे जुल्किफार खानाची कुमक कमी झाली. मोघलांचा डाव हाणून पाडणारे गोदाजी जगताप, जिवाजी सर्कले नाईक आणि त्यांच्या 70 योद्ध्यांनी एक नवा इतिहास रचला. गोदाजी जगताप यांच्या या शौर्यामुळे छत्रपती राजाराम महाराज यांनी त्यांना 35 हजार पायदळाचे सरनोबत केले. मात्र, यानंतर गोदाजी यांचे नाव इतिहासात आढळत नाही.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1645 मध्ये स्वराज्याचा आरंभ केला. त्यावेळी गोदाजी जगताप हे त्यांच्यासोबत होते. शिवाजी महाराज यांचे वय त्यावेळी अवघे 15 वर्ष इतके होते. त्यामुळे 1689 ला कावल्या बावल्याची खिंड येथे लढाई झाली त्यावेळी त्याचे वय 59 ते 60 वय असावे असा अंदाज आहे. या लढाईनंतर गोदाजी जगताप यांच्या नावाची नोंद इतिहासात आढळत नाही. त्यामुळे पुढे त्यांचा मृत्यू वृद्धापकाळाने झाला असावा असा अंदाज आहे.