मृत व्यक्तीच्या नावाने टेंडर मंजूर, बोगस सह्या, प्रकरण उजेडात आल्यानंतर…
विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी पोलिसांना या प्रकरणाबाबतचे पत्र दिले आहे. त्याचबरोबर संबंधित कागदपत्रे सुध्दा पोलिसांना दिली आहेत.
शाहिद पठाण, गोंदिया : मृत व्यक्तीच्या नावाने टेंडर मंजूर (Tender approved) करून बोगस स्वाक्षऱ्या करून तब्ब्ल 72 लाख रुपयाचे बिल काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया (Gondia) जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात (Zilla Parishad Construction Department) उघडकीस आला आहे. दरम्यान गोंदिया जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात चौकशीचे आदेश देत खोटी माहिती व मृत व्यक्तीच्या नावे टेंडर प्रक्रिया करून काम करत पैसे देखील काढणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी पोलिसांना या प्रकरणाबाबतचे पत्र दिले आहे. त्याचबरोबर संबंधित कागदपत्रे सुध्दा पोलिसांना दिली आहेत.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातंर्गत 8 लाख रुपये किमतीच्या विद्युतीकरणाचे 8 कामे गोंदिया शहरातील बग्गा यांच्या फर्मला देण्यात आली होती. त्यातच भरनोली येथील उप केंद्राकरिता 7 लाख 15 हजार रुपयाच्या कामाची निविदा गोंदियातील पी. ए. बग्गा कॉन्ट्रक्टर एण्ड सप्लायर यांनी सादर केली होती. ती निविदा 0.11 टक्के कमी दराने सादर केल्याने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी 4 मार्च 2022 ला अति. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात बग्गा फर्मच्या संचालकांना वाटाघाटीसाठी बोलविण्यात आले होते.
विशेष म्हणजे बग्गा फार्मचे संचालक प्रीत पालसिंग अमोलकसिंग बग्गा यांचा मृत्यू 19 फेबुवारी 2021 ला झाल्याची नोंद घेण्यात आली, तरी सुद्धा त्यांच्या नावावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टेंडरची वाटाघाटी करण्यासाठी बोलविले असता मृत व्यक्ती कसा आला असा प्रश्न उपस्थित होत होता. तर बग्गा फार्मचे संचालक प्रीतपालसिंग अमोलकसिंग बग्गा हे मृत असताना त्यांच्या मुलाने स्वतः मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हजर राहून शासनाची फसवून करीत हे वर्क आर्डर मिळवली.
या सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली असता, स्वत : मुख्यकार्यकारी अधिकारी शीतल पुंड यांनी स्वतः पोलिसात फौजदारी गुन्हा नोंद करण्यासाठी पत्र काढले आहे. त्याचबरोबर पोलिसांना लागत असलेली संपूर्ण कागत पत्रे सुद्धा पोलिसांना पुरवली आहेत. पोलीस आता या प्रकारची संपुर्ण चौकशी करत असून यामध्ये कोणकोण सहभागी आहे. हे आता पोलीस तपासात समोर येईल अशी माहिती शीतल पुंड यांनी दिली.