नाना पटोले लढून नव्हे रडून निवडणुका जिंकतात; नाना पटोले यांच्यावर केलेत गंभीर आरोप
नाना पटोले हे लढून कधीच जिंकत नाहीत. ते नेहमी रडून जिंकतात. साकोली विधानसभा मागच्या वेळी तुम्ही बघीतली असेल. त्यावेळी शेवटच्या क्षणाला रडून नाना पटोले यांनी परिणय फुके यांच्या विरोधात निवडणूक जिंकली.
गोंदिया : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले हे जातीयवादी आहेत. त्यांच्या कार्यशैलीला कंटाळून मी आपल्या जिल्हा कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश करत आहेत. नाना पटोले लढून जिंकणारे नेते नाहीत तर रडून जिंकणारे नेते असल्याचा हल्लाबोल रत्नदीप दहीवले यांनी केला. रत्नदीप दहीवले यांनी गोंदियात भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. यावेळी ते बोलत होते. गोंदिया जिल्ह्याच्या मोरगाव अर्जुनीत झालेल्या भाजप मेळाव्यात भाजपाला बंपर लॉटरी लागली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हजारो काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचे कार्याध्यक्ष रत्नदीप दहीवले यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला.
नाना पटोले यांचे अध्यक्षपद जाणार
रत्नदीप दहीवले म्हणाले, नाना पटोले हे लढून कधीच जिंकत नाहीत. ते नेहमी रडून जिंकतात. साकोली विधानसभा मागच्या वेळी तुम्ही बघीतली असेल. त्यावेळी शेवटच्या क्षणाला रडून नाना पटोले यांनी परिणय फुके यांच्या विरोधात निवडणूक जिंकली. नाना पटोले यांचे प्रदेश अध्यक्षपद लवकर जाणार आहे. त्यासाठी त्यांनी आता इमोशनल ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू केलं.
ढोंगी लोकांना थांबवलं पाहिजे
इलेक्ट्रॉनिक मीडियाला पकडतात आणि त्यांना सांगतात. मी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत होतो. त्याठिकाणी छोले बठुरे खात होतो. त्यावेळी राहुल गांधी म्हणाले, तुमच्या घरचे छोले बठुरे खूप छान झालेत. माझी बहीण प्रियंका गांधी यांना छोले बठुरे फार आवडतात. मी घरी गेल्यानंतर प्रियंका गांधी यांना छोले बठुरे खाऊ घालणार आहे. प्रेम भावा-बहीणचं आणि डोळ्यात पाणी नाना पटोले यांच्या आले. प्रतापगड हे लढण्याचे शौर्याचे प्रतीक आहे. पण, नाना पटोले हे प्रतापगडावर कॅमेऱ्यासमोर चक्क रडले. म्हणून जे ढोंग करून आपल्याला फसवत आहेत. त्यांना आपण थांबवलं पाहिजे, असंही रत्नदीप दहीवले यांनी म्हंटलं.
मोरगाव अर्जुनी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच धन्यवाद मोदीजी, चित्रकला स्पर्धा पुरस्कार वितरण सोहळा तसेच भाजपचा कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मंचावर आमदार परिणय फुके, विदर्भाचे संघटनमंत्री उपेंद्र कोठेकर, खासदार सुनील मेंढे, माजी मंत्री राजकुमार बडोले हे उपस्थित होते.