दुकानातून घरी जात होता ९ वर्षीय मुलगा; रस्त्यात काळाने घातला घाला
राफनचे परीक्षेचे दिवस होते. आपण आता पुढच्या वर्गात जाणार. त्यापूर्वी सुट्या लागणार. तेव्हा सुट्यांची मजा कुठं लुटायची, याचे काही प्लान केले होते. पण, ते आता कधीही पूर्ण होणार नाहीत.
गोंदिया : राफन हा नऊ वर्षांचा मुलगा. घराशेजारीच दुकान आहे. त्यामुळे तो काही वस्तू आणण्यासाठी दुकानात गेला होता. वस्तू घेतल्या आणि तो घरी परत येत होता. घर आणि दुकान यांचे अंतर फारच कमी आहे. तेवढ्यात त्या रस्त्यावरून एक ट्रक जात होता. ट्रक या रस्त्यावरून नेमही ये-जा करतात. कारण बाजूलाच एफसीआयचे गोदाम आहे. या गोदामातून धान्य ने-आण करण्यासाठी ट्रक असतात. या ट्रकने ९ वर्षीय मुलाचा घात केला. त्यानंतर जमाव संतप्त झाला. त्यांनी थेट ट्रकच पेटवला. पण, राफन आता परत येणार नाही.
बाजपाई चौकात घडली घटना
गोंदिया शहरातील वाजपाई वॉर्डामधील दुकानातून घरी जात असलेल्या 9 वर्षीय मुलाला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकने चिरडले. यात मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही दुर्घटना काल सायंकाळी सुमारास शहरातील बाजपाई चौकात घडली. घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
राफन अफरोज शेख (9, रा. बाजपाई चौक) असे मृत मुलाचे नाव आहे. रामनवमीचा उत्सव तसेच रमजान महिना सुरू आहे. परिस्थिती चिघळू नये म्हणून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मुलगा दुकानातून घरी जात होता
बाजपाई चौक परिसरात एफसीआयचे गोदाम आहेत. या रस्त्यावर नेहमी ट्रकची वर्दळ असते. कालही उत्तर प्रदेशातील ट्रक धान्य नेण्यासाठी येत होते. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यात ट्रक थेट दुकानातून घरी जात असलेल्या मुलाला धडकला.
संतप्त नागरिकांना जाळला ट्रक
घटनेनंतर नागरिक संतप्त झाले. जमावाने ट्रकला आग लावली. यात ट्रक जळून खाक झाला. गोंदिया शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत मुलाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यासाठी मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.
राफनचे परीक्षेचे दिवस होते. आपण आता पुढच्या वर्गात जाणार. त्यापूर्वी सुट्या लागणार. तेव्हा सुट्यांची मजा कुठं लुटायची, याचे काही प्लान केले होते. पण, ते आता कधीही पूर्ण होणार नाहीत.