Gondia Farmer | गोंदियातील शेतकऱ्याची कलिंगडासोबत काटेकोहऱ्याची लागवड, 10 एकरात 12 लाखांचा नफा; 25 जणांना रोजगार
शेतीत काही होत नाही, असं नाही. एखाद्यानं मेहनत घेतली तर त्यातूनही लाखो रुपये मिळवू शकता. हे या प्रगतशील शेतकऱ्यानं दाखवून दिलं. त्यामुळं प्रयोग केल्यास शेती नक्कीच चांगले उत्पादन देते, हे यातून दिसून येते.
गोंदिया : धानाचे कोठार अशी गोंदिया जिल्ह्याची ओळख. शेतकरी आता फळ, भाजीपाल्याचे उत्पादन करू लागले. यातच अर्जुनी मोरगाव (Arjuni Morgaon) तालुक्यातील धाबेटेकडी (Dhabetekadi) गावातील शेतकरी नंदू सोनवाणे (Nandu Sonwane) यांनी कलिंगडासोबतच काटेकोहऱ्यांची लागवड करीत लाखोंचा नफा मिळवला आहे. पारंपरिक शेतीला पिकाला फाटा देत कलिंगड आणि काटेकोहऱ्यांचे उत्पादन घेत लाखोंचा नफा मिळवला. काटेकोहरा विक्रीकरिता हल्दीराम कंपनीशी करार केला. गावातील 25 लोकांना रोजगार दिला. शेतीत काही होत नाही, असं नाही. एखाद्यानं मेहनत घेतली तर त्यातूनही लाखो रुपये मिळवू शकता. हे या प्रगतशील शेतकऱ्यानं दाखवून दिलं. त्यामुळं प्रयोग केल्यास शेती नक्कीच चांगले उत्पादन देते, हे यातून दिसून येते.
सहा एकरात कलिंगडाची लागवड
गोंदिया जिल्ह्यात मुख्य पीक म्हणून धान पिकाची लागवड केली जाते. मात्र धानपिकात योग्य नफा मिळत नाही. त्यामुळं शेतकरी नगदी पिकाकडे वळत आहेत. त्यातच धाबेटेकडी येथील शेतकरी नंदू सोनवाणे याने आपल्या सहा एकर शेतात कलिंगडाची लागवड केली. बारा लाख रुपयांचा नफा मिळवला. त्यांना सहा एकरात चार लाख रुपये लागवड खर्च आला. आठ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. त्यांनी कलिंगडाची लागवड डिसेंबर महिन्यात केली. दीड बाय दीड फूट आणि सहा फूट लांबीचे अंतर ठेवत कलिंगडाची लागवड केली. यासाठी त्यांनी रशिया, म्यॅक्स, यूएस 2008 या पिकाची लागवड केली. अशी माहिती प्रगतशील शेतकरी नंदू सोनवाणे यांनी दिली.
चार एकरात काटेकोहऱ्याची लागवड
नंदू यांनी चार एकर जागेत काटेकोहराचे उत्पादन घेतले. यासाठी त्यांनी हल्दीरामसारख्या ब्रॅण्ड कंपनीशी करार केला. जानेवारी महिन्यात काटेकोहऱ्याची लागवड केली. एप्रिल महिन्यात त्यांना उत्पादन हाती आले. बाजार भावाप्रमाणे सात ते दहा रुपये प्रती किलो प्रमाणे ते या पिकाची विक्री करतात. यातून त्यांना जवळपास शंभर टन म्हणजे अंदाजित सात ते दहा लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित आहे. अशी माहिती शेतकऱ्यासह मजूर वनिता कुंभारे यांनी दिली. तर याच माध्यमातून नंदू यांनी आपल्या गावातील 25 बेरोजगार लोकांना रोजगारही दिले आहे. हे विशेष तर तुम्ही देखील पारंपरिक शेतीला फाटा देत नगदी पिकांकडे वळा. तुम्ही देखील शेतीतून आर्थिक उन्नती साधू शकता हे मात्र निश्चित…